scorecardresearch

Premium

उल्हासनगरात टँकरच्या स्फोटात चौघांचा मृत्यू; सेंच्युरी रेयॉन कंपनीतील घटना

उल्हासनगर येथील शहराच्या शहाड भागात असलेल्या सेंच्युरी रेयॉन या कंपनीत शनिवारी सकाळी टँकरच्या भीषण स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

century rayon , Century Rayon Company , tanker explosion in Ulhasnagar
उल्हासनगरात टँकरच्या स्फोटात चौघांचा मृत्यू; सेंच्युरी रेयॉन कंपनीतील घटना

उल्हासनगर: येथील शहराच्या शहाड भागात असलेल्या सेंच्युरी रेयॉन या कंपनीत शनिवारी सकाळी टँकरच्या भीषण स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींची नावे समजू शकलेली नाहीत. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. दरम्यान, कंपनी प्रशासनाने मात्र दोनच जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले असून दोघांचा शोध सुरू असल्याचा दावा केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील शहाड येथे आदित्य बिर्ला समुहाची सेंच्युरी रेयॉन कंपनी आहे. या कंपनीत सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास बाहेरून आलेल्या टँकरची (एमएच ०४ जीसी २४८७) तपासणी सुरू होती. त्याचवेळी टँकरच्या टाकीचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, बिर्ला गेट चौक, शहाड गावठाण आणि आसपासच्या परिसरात हादरे जाणवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्फोटावेळी कामगार दूरवर फेकले गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबत उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांनी विचारले असता, सेंच्युरी रेयॉन कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या चार जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. यातील मृतांची ओळख पटली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

dengue Kamothe
कामोठेत महिनाभरात डेंग्यूचा दूसरा बळी
janhavi kandula
जान्हवी कंडुलाच्या मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई
leopard die
नाशिक : एका बिबट्याला वाचविण्यात यश, दुसऱ्याचा मृत्यू
Police raid hookah parlor Gokulpeth
विला ५५ कॅफेत हुक्क्याचा धूर, नागपूरच्या गोकुळपेठेतील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

हेही वाचा >>>सात सट्टेबाजांना अटक, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्यावर सुरू होता सट्टा

सेंच्युरी रेयॉन कंपनीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आणखी दोघांचा शोध सुरू असून इतर चौघे जखमी आहेत. या घटनेची कंपनी व्यवस्थापनातर्फे चौकशी सुरू असून परिस्थिती आटोक्यात असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात येणार असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने म्हटले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Four killed in century rayon company tanker explosion in ulhasnagar amy

First published on: 23-09-2023 at 20:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×