कल्याण-नगर मार्गाचे चौपदरीकरण लवकरच

मुंबई, ठाणे यांसारख्या महानगरांना अहमदनगर, पुणे ग्रामीण भागाला जोडण्यासाठी कल्याण-अहमदनगर राज्यमार्ग महत्त्वाचा आहे.

भूमी अधिग्रहणाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश

बदलापूर : भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसह प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या कल्याण-अहमदनगर महामार्गाच्या वरपगाव ते माळशेज या भागात रखडलेल्या चौपदरीकरणाचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेश दिल्लीत झालेल्या बैठकीत या मार्गासाठी भूसंपादनाचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई, ठाणे यांसारख्या महानगरांना अहमदनगर, पुणे ग्रामीण भागाला जोडण्यासाठी कल्याण-अहमदनगर राज्यमार्ग महत्त्वाचा आहे. याच मार्गावरून भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक होत असते. तसेच प्रवासी वाहतुकीसाठीही या रस्त्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र दुपदरी असलेल्या या रस्त्याला वाहतुकीच्या अनेक मर्यादा आल्या आहेत. या रस्त्याचे कल्याण ते म्हारळ गावापर्यंत चौपदरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरी भागातून जाणाऱ्या या मार्गाच्या काही भागांचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण झाले. मात्र वरप, कांबा ते थेट मुरबाड आणि माळशेजपर्यंत हा रस्ता दोनपदरीच आहे. गेल्या काही वर्षांत या मार्गावर वाहनांची वाढलेली वाहतूक पाहता या मार्गाच्या चौपदरीकरणाचे आणि काँक्रीटीकरणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या भिवंडी मतदारसंघात येणाऱ्या या रस्त्याचे रुंदीकरण भूसंपादनाअभावी रखडले होते. नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्ली येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत या रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहाड उड्डाणपुलाचे विस्तारीकरण

महामार्गावर शहाड येथे रेल्वेवर उड्डाणपूल असून त्याची क्षमताही संपलेली आहे. या भागाला कोंडीतून बाहेर काढण्यासाठी हा उड्डाणपूल विस्तारित करणे महत्त्वाचे आहे. त्याला मंजुरी देण्यात आली. बदलापूर- म्हसा- माळशेज घाट या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊनत्यादृष्टीने उभारणी करण्याचा प्रस्तावही या वेळी मांडण्यात आला.

रुंदीकरण वेगाने होण्याची गरज

कल्याण-अहमदनगर महामार्गावर शहाड, म्हारळ, वरप, कांबा, रायते ही झपाटय़ाने विकसित होणारी निम्न शहरे असून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शहरांच्या प्रवेशद्वारातच मोठी कोंडी होत असते. ही कोंडी फोडण्यासाठी वरप, कांबा या भागांत या रस्त्याचे रुंदीकरण वेगाने होण्याची गरज आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Four laning of kalyan nagar road soon ssh

Next Story
सोनावणेंच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा
ताज्या बातम्या