डोंबिवली – सुदृढ आरोग्याचा संदेश देत डोंबिवली, पुणे आणि इंदोर येथील चार ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या नेहमीच्या वापरातील सुस्थितीमधील स्कुटर, मोटार सायकलचा वापर करून आसाम ते राजस्थान हे चार हजार किलो मीटरचे अंतर मागील १६ दिवसात पार पाडले. ५९ ते ६६ वयोगटातील या ज्येष्ठांना या प्रवासात निसर्ग रम्य वातावरण, शुध्द हवा आणि प्रशस्त वाहतूक विरहित रस्ते याचा आनंद घेता आला.
या उपक्रमात डोंबिवलीतून आनंंद कानिटकर (६६), पुण्यातून विलास पेंडसे (६२), इंदोर येथील महेश पोतदार (५९), देवेंद्र डबकरा सहभागी झाले होते. वाढते प्रदूषण, उष्णतामान आणि त्यामुळे धोक्यात आलेले जीवनमान या विषयावर चर्चा करत असताना या चार ज्येष्ठांनी या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येकाने आपले आरोग्य सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. यासाठी स्वसामर्थ्याने देशहिताचा विचार करून एक सार्वजनिक संदेश देण्यासाठी काम करणे आवश्यक आहे, असा विचार केला. या चर्चेतून आसाम ते राजस्थान हा प्रवास रस्ते मार्गाने आपल्या जुन्या नेहमीच्या वापरातील दुचाकीवरून करण्याचा निर्णय घेतला.
प्रवासाला सुरूवात
आपल्या दोन स्कुटर, एक मोटार सायकल या दुचाकी, इतर सामानासह हे चारही ज्येष्ठ रेल्वेने आसाममधील तनिसुकिया येथे पोहचले. १० जानेवारी २०२६ रोजी त्यांनी तनिसुकिया येथून दुचाकीवरून राजस्थानच्या दिशेने प्रवास सुरू केला. दररोज दीडशे तर कधी तीनशे किलोमीटरचा प्रवास हे ज्येष्ठ करत होते. शुध्द हवा, निसर्ग रम्य वातावरण, प्रशस्त स्वच्छ नद्या, डोंगर, दऱ्या त्यामुळे ज्येष्ठ असुनही कधी अंगदुखी, इतर प्रवासाचा त्रास झाला नाही. एवढ्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासारखे वाहने अडविणारे वाहतूक पोलीस भेटले नाहीत. काही राज्य हद्द पार करताना काही ठिकाणी पोलिसांनी थांबवले. आमचे पिकलेले पांढरे केस, वृध्दत्वाकडे झुकलेली आमची शरीरयष्टी पाहून त्यांनी ही कामे आम्ही केली पाहिजेत. ती आता तुम्ही करताय, अशी टिपणी करून त्यांनी वाहनांची कागदपत्रे न पाहता आम्हाला सोडून दिले. याऊलट आपणास काही साहाय्य लागले तर जरूर सांगा असे आश्वासन दिले, असे साहसी दुचाकी स्वार आनंद कानिटकर यांनी सांगितले.
प्रेक्षणिय ठिकाणे
आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, राजस्थान असा प्रवासाचा मार्ग होता. या प्रवासात आसाममधील काझिरंगा अभयारण्य, गुवाहटीचे कामाख्य देवी मंदिर, अयोध्येतील राम मंदिर, आग्रा येथील लाल किल्ला, फत्तेपूर सिक्री, जयपूर, जोधपूरचे किल्ले, थरचे वाळवंट, भारत पाकिस्तान सीमा, १९७१ भारत पाकिस्तान युध्द स्मारक अशा ऐतिहासिक, धार्मिक स्थळांना या सोळा दिवसात ज्येष्ठांनी भेटी दिल्या.
साधा आहार
सकाळीच प्रवासाला सुरूवात करून दीडशे ते तीनशे अंतर पार करत होतो. इतर आहार, अरबट चरबट न खाता फक्त फळे खाण्यावर भर होता. प्रवास थांबल्यावर फळे, हलके भोजन घेऊन तात्काळ झोपी जात होतो. झोप पूर्ण करून सकाळीच प्रवासाला सुरूवात करत होतो. त्यामुळे आम्हाला कधी थकवा आला नाही. काही त्रास झाला तर त्या उपचाराची सर्व औषधे सोबत होती. पण ती घरी परतेपर्यंत बाहेर काढायची कधी वेळ आली नाही, असे आनंद कानिटकर यांनी सांगितले.
प्रत्येकाने सृदृढ आरोग्याचा विचार करून आपल्या क्षमतेने असे जनजागृतीचे उपक्रम राबविले पाहिजेत. यामधून एक सर्वदूर संदेश जातो. कठोर शारीरिक श्रमाची मानसिकता, दुर्दम्य आत्मविश्वास असेल तर या मोहिमा अवघड नाहीत. -आनंद कानिटकर साहसी प्रवासी

