नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कल्याणमधील सेवकाची फसवणूक ; बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

‘आपण अलिबाग जवळील रेवदंडा येथील सद्गुरू नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमधील सेवेकरी आहोत.

crime-1
(प्रातिनिधिक छायाचित्र)

कल्याण- ‘आपण अलिबाग जवळील रेवदंडा येथील सद्गुरू नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमधील सेवेकरी आहोत. श्री सेवेचा भाग आपणास देण्यात आला आहे. आपण खूप मोठे गृहस्थ आहोत,’ अशी खोटी बतावणी करून कल्याणमधील प्रतिष्ठानच्या एका श्री सदस्याची भुरट्याने पाच हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

विश्वजीत अनिल कदम (३५, रा. दत्त सोसायटी, आंबेडकर रोड, कल्याण पश्चिम) या सेवकाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात श्री सदस्याच्या नावे संपर्क करणाऱ्या श्रीकांत गोविंद भोईर (रा. रेवदंडा, अलिबाग) या भुरट्या विरुध्द फसवणुकीची तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी सांगितले, रेवदंडा येथील श्रीकांत भोईर याने विश्वजीत यांच्या मोबाईलवर संपर्क केला. आपण खूप मोठे गृहस्थ आहोत. रेवदंडा येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानशी आपण संबंधित आहोत. आपल्यावर श्री सेवेचा भाग देण्यात आला आहे, अशी खोटी माहिती श्रीकांतने तक्रारदार विश्वजीत यांना दिली. प्रतिष्ठानशी संबंधित श्री सदस्य आपणाशी बोलतो म्हणून विश्वजीत यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तुमच्यावर येणारी सर्व संकटे दूर करीन असे सांगून श्रीकांतने विश्वजीत यांच्याकडे पैशाची मागणी केली. पैसे दिले नाही तर आपल्यावरली संकटाची व्याप्ती वाढेल, असे सांगितले. यामुळे घाबरलेल्या विश्वजीत यांनी भुरट्याने दिलेल्या बँक खातेधारक ऐजाज कुरेशी याच्या खात्यावर पाच हजार रुपये गुगल पे व्दारे जमा केले.

दुसऱ्या दिवशी भामटा श्रीकांत याने विश्वजीत यांच्या बहिणीला संपर्क केला. तुमचे भाऊ विश्वजीत कुठे आहेत असे विचारून पैशाची मागणी केली. बहिणीने घडला प्रकार विश्वजीतला कळविला. हे प्रकरण संशयास्पद वाटू लागल्याने विश्वजीत यांनी रेवदंडा येथे श्री समर्थ परिवार कार्यालयात संपर्क केला. तेव्हा त्यांना नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून कोणतीही देणगी स्वीकारली जात नाही. कोणत्याही प्रकारचे व्यवहार केले जात नाहीत आणि सेवेच्या रुपात कोणत्याही प्रकारची भेट, देणगी स्वीकारली जात नाही. ही माहिती मिळाल्यावर श्रीकांतने आपली फसवणूक केली आहे. हे लक्षात आल्यावर विश्वजीत देशमुख यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात जाऊन भामटा श्रीकांत विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तांत्रिक माहितीच्या आधारे श्रीकांत, त्याचा साथीदार ऐजाज याचा शोध सुरू केला आहे. हा सगळा प्रकार ऐकून समर्थ परिवारातील श्री सदस्य आवाक झाले आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fraud servant welfare nanasaheb dharmadhikari pratishthan filed case bazarpeth police station crime amy

Next Story
उद्धव यांच्या परवानगीशिवाय एकनाथ शिंदेंनी तेव्हा घेतलेली राज ठाकरेंची भेट; भेटीत म्हणालेले, “खरं तर आम्ही तुमच्यासोबतच…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी