डोंबिवली पलावातील महिलेची वाढीव परतव्याचे आमिष दाखवून फसवणूक

कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील कासाबेला पलावा येथील एका महिलेला एका अनोळखी इसमाने मोबाईलवर संपर्क करून ऑनलाईन गुंतवणुकीतून वाढीव परताव्याचे आमिष दाखवून पाच लाख पंधरा हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

डोंबिवली पलावातील महिलेची वाढीव परतव्याचे आमिष दाखवून फसवणूक
( संग्रहित छायाचित्र )

डोंबिवली- कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील कासाबेला पलावा येथील एका महिलेला एका अनोळखी इसमाने मोबाईलवर संपर्क करून ऑनलाईन गुंतवणुकीतून वाढीव परताव्याचे आमिष दाखवून पाच लाख पंधरा हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

२९ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली आहे. माधुरी धीरज भोसले (रा. कासाबेला पलावा, डोंबिवली पूर्व) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात त्यांनी फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. एका अनोळखी इसमाने माधुरी भोसले यांच्या मोबाईल क्रमांकावर २९ जुलै रोजी संपर्क साधला. त्याने ऑनलाईन गुंतवणुकीतून वाढीव परतावा देण्याचे आमिष दाखविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला माधुरी यांनी इसमाने दिलेल्या माहितीकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर इसम माधुरी यांना दररोज संपर्क करुन आपण तुम्हाला व्हाॅट्सपवर पाठविलेली लिंक उघडा. त्यामधील एक उपयोजना (ॲप) उघडा असा तगादा लावू लागला. दोन व्हाॅट्सप क्रमांकावरुन इसम माधुरी यांच्याशी संवाद साधत होता. माधुरी यांनी इसमाने सांगितल्याप्रमाणे उपयोजन स्थापित करुन त्याच्या सांगण्याप्रमाणे ऑनलाईन माहितीची प्रक्रिया पूर्ण केली. ही प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्हाला वाढीव परतावा मिळणार असे इसम सांगू लागला. इसमाने सांगितल्याप्रमाणे माधुरी यांनी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करताच, माधुरी यांच्या बडोदा बँक सेलू शाखेतील बचत खात्यामधील ठेव रकमेतील, लोढा हेवन नेरळ शाखा, लोढा हेवन आयसीआयसीआय शाखेत ठेव रकमेत ठेवलेली एकूण पाच लाख १५ हजार ३७९ रुपये भामट्याने कोणताही वाढीव परतावा न देता परस्पर वळती केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर माधुरी भोसले यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात भामट्या विरुध्द फसवणुकीची तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. गेल्या काही महिन्यात मध्यमवर्गिय, उच्चभ्रूंची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पलावा वसाहतीमधील रहिवाशांना भामट्यांनी लक्ष केल्याचे दिसते. मानपाडा पोलीस ठाण्यात दर महिन्याला पलावा वसाहतीमधील दोन ते तीन रहिवाशांची भामट्यांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी दाखल होत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fraud woman increased returns online investments ysh

Next Story
कल्याणमध्ये एकाच इमारती मधील दोन घरे फोडून चार लाखाचा ऐवज लंपास
फोटो गॅलरी