ठाणे : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ड्रोनचा वापर दिवसेंदिवस वाढत असून शेती, भूमापन, छायाचित्रण, ध्वनिचित्रफीत, आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध सरकारी प्रकल्पांच्या निरीक्षणासाठी ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात ‘अमृत’ संस्थेकडून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणाद्वारे युवकांना केवळ अत्याधुनिक कौशल्यच नव्हे, तर अधिकृत ड्रोन उड्डाण परवानाही दिला जात असून स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील इच्छुकांनी यासाठी अर्ज करण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

ड्रोन तंत्रज्ञानामुळे रोजगार आणि उद्योजकतेची नवी दालने खुली होत आहेत. शेती फवारणी, पीक सर्वेक्षण, जमिनीचे मोजमाप, एरियल सर्व्हे, लग्न समारंभ व कार्यक्रमांचे चित्रीकरण, औद्योगिक निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रांत प्रशिक्षित ड्रोन पायलटची मागणी वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन अमृत संस्थेने युवकांना आधुनिक कौशल्यासह रोजगारक्षम बनविण्याचा पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे, बाजारात लाखो रुपये खर्च करून घ्यावे लागणारे हे अत्याधुनिक प्रशिक्षण अमृत संस्थेकडून पूर्णपणे मोफत दिले जाते.

दहा दिवसांचा निवासी कोर्स, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था, तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह आधुनिक प्रशिक्षण या सर्व सुविधा संस्थेमार्फत उपलब्ध करून दिल्या जातात. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत ड्रोन ऑपरेटर परवाना दिला जातो. त्यामुळे प्रशिक्षित युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी निर्माण होत आहे.

राज्यातील आठ प्रशिक्षण केंद्रांवर हे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांच्या सुरक्षित उड्डाण नियमावलीची माहिती, ड्रोन हाताळणी, देखभाल, उड्डाण तंत्र, तांत्रिक बाबी तसेच प्रत्यक्ष उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे, प्रशिक्षणानंतर इच्छुक उमेदवारांना ड्रोन खरेदी करून व्यवसाय सुरू करण्यासाठी अमृत संस्थेच्या कर्ज व्याजपरतावा योजनेचाही लाभ मिळू शकतो.

ही योजना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू असून वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र उमेदवारांना याचा लाभ घेता येणार आहे. उमेदवाराचे वय १८ ते ५५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक असून तो किमान बारावी उत्तीर्ण असावा. शेतकरी कुटुंबातील युवकांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्याचा फिटनेस दाखलाही आवश्यक राहणार आहे. ठाणे जिल्ह्यातील इच्छुक युवकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमृत संस्थेची सर्व प्रक्रिया ऑनलाइन आणि पूर्णतः पारदर्शक असून अर्ज थेट संस्थेच्या संकेतस्थळावर करता येतो. जिल्ह्यातील इच्छुकांनी योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी ठाणे जिल्हा कार्यालयातील जिल्हा उपव्यवस्थापक माया रत्नपारखी-खेत्रे यांच्याशी ९११२२२६५३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. याचसमवेत या योजनेविषयीची सविस्तर माहिती https://app.mahaamrut.org.in/amrut-new/scheme/245 यावर उपलब्ध असून येथून योजनेसाठी अर्ज करता येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.