ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आदर्श सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. या अन्नछत्रच्या माध्यमातून दररोज शंभर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण दिले जाणार असून येत्या काही महिन्यात दररोज तीनशे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देण्याचा मानस आहे.

ठाणे महापालिकेचे कळवा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. हे रुग्णालय पाचशे खाटांचे आहे. या रुग्णालयात ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेकडो गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. याशिवाय, पालघर जिल्ह्यातूनही रुग्ण येथे उपचारासाठी येतात. अनेकदा रुग्णाला उपचारासाठी दाखल केले तर, त्याच्या नातेवाईकांना तीन ते चार दिवस किंवा त्याहून अधिक दिवस रुग्णालयातच थांबावे लागते.

यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांच्या जेवणाचे हाल होतात. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक स्वर्गीय मुकूंद केणी यांनी रुग्ण नातेवाईकांसाठी मोफत अन्नछत्र उभारणीची संकल्प आखला होता आणि यासंबंधीचा प्रस्ताव पालिकेकडे सादर केला होता. त्यास पालिकेने मान्यताही दिली.

दरम्यान, मुकूंद केणी यांचे निधन झाले. यानंतर त्यांची संकल्पना त्यांचे चिरंजीव आणि आदर्श सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मंदार केणी यांनी पुढे नेली आणि काही दिवसांपुर्वी अन्नछत्र उभारणीचे काम मार्गी लागले. या अन्नछत्रचे उदघाटन कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक उतेकर आणि स्थानिक नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, माजी नगरसेविका अपर्णा साळवी, मनाली पाटील, सुरेखा पाटील, नगरसेवक मिलिंद साळवी, परिवहन सदस्य प्रकाश पाटील आणि तकी चेऊलकर, वकील मदन ठाकूर, उद्योजक मंदार केणी आणि मयूर केणी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातून जे रुग्ण येथे उपचारासाठी येतात. त्यांच्या नातेवाईकांचे जेवणाचे अत्यंत हाल होतात. ही संपूर्ण परिस्थिती स्वर्गीय मुकुंद केणी यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली होती. त्यामुळे माणुसकीच्या दृष्टिकोनातून अन्नछत्र चालू करण्याची संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली होती. ती संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे काम आदर्श सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टचे मंदार केणी यांनी केले आहे, असे माजी विरोधी पक्ष नेत्या प्रमिला केणी यांनी यावेळी सांगितले.