नोंदणीप्रक्रियेविषयी जागृती न झाल्याने लाभापासून वंचित

ठाणेकरांना मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने शहरभर तीनशेहून अधिक ठिकाणी वायफाय सेवा सुरू केली असली तरी, या मोफत सेवेबद्दल असंख्य ठाणेकर अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. ही सेवा मिळवण्यासाठी ठाणेकरांना १०० रुपये भरून पालिकेकडे नोंदणी करावी लागणार आहे. मात्र, ही नोंदणी कशी व कुठे करायची, याबद्दल पुरेशी जनजागृती न झाल्याने ही योजना वापराविना वाया जात आहे.

ठाणे शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मोठय़ा प्रकल्पांची घोषणा करून त्यापैकी काही प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. स्मार्ट सिटी योजनेचा एक भाग म्हणून आयुक्त जयस्वाल यांनी दोन वर्षांपूर्वी संपूर्ण शहर वाय-फाययुक्त करण्याची घोषणा केली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गेल्या आठवडय़ात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. खासगी लोकसहभागातून ही योजना राबविण्यात येणार असल्यामुळे महापालिकेला भांडवली तसेच महसुली खर्च करावा लागणार नसून या योजनेतून उलट संबंधित ठेकेदाराकडून उत्पन्नातील काही हिस्सा मिळणार आहे. संबंधित ठेकेदाराकडून ५१२ केबीपीएस स्पीडपर्यंत विनामूल्य वाय-फाय सेवा पुरविली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना केवळ एकदाच नोंदणी करावी लागणार असून त्यासाठी ठेकेदाराकडून एकदाच शंभर रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे. याव्यतिरिक्त हायस्पीड वाय-फायची सुविधा नागरिकांना हवी असेल तर त्यासाठी मात्र ठेकेदाराकडून ठरलेल्या योजनेप्रमाणे नागरिकांना पैसे भरावे लागणार आहेत. खासगी लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा ठेका संबंधित ठेकेदाराला दहा वर्षांकरिता देण्यात आला असून तोपर्यंत तरी ठाणेकरांना मोफत वाय-फाय सेवा मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

३१० ठिकाणी यंत्रणेची उभारणी

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ३१० ठिकाणी वाय-फाय उपकरणे बसविण्यात आली आहे. त्यामध्ये ठाणे शहर, वागळे, कोपरी, वर्तकनगर, वसंतविहार या परिसराचा समावेश आहे. घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातही अनेक ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली असून येथील उर्वरित भागात लवकरच ९० उपकरणे बसविण्यात येणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून या यंत्रणेच्या उभारणीचे काम सुरू असून या कामादरम्यान प्रायोगिक तत्त्वावर नागरिकांना विनामूल्य नोंदणी करून वाय-फाय सेवा पुरविली जात होती. त्यामध्ये गेल्या सहा महिन्यांत एक लाख ७५ हजारपेक्षा अधिक नागरिकांनी विनामूल्य वाय-फाय सेवेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती इनटेकवायफाय कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमोल नलावडे यांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना दिली. कंपनीच्या www.Intechy5.com या संकेतस्थळावर याबाबत विस्तृत माहिती उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

योजनेसाठी नोंदणी कशी करावी?

  • मोबाइलमधील सेटिंगमध्ये जाऊन वायफायवर क्लिक करावे. त्यानंतर Intechycom या नावावर क्लिक केल्यानंतर योजनेच्या नोंदणीसाठी एक पेज ओपन होईल किंवा वेब ब्राऊजरमध्ये जाऊन Intechy5.com असे लिहून सर्च करावे आणि त्यानंतरही योजनेच्या नोंदणीसाठीही पेज ओपन होईल.
  • दोन्ही पेजवर योजनेसाठी लॉगइन करावे आणि त्यानंतर नाव, आडनाव, मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी अशी माहिती भरून नोंदणी करावी.
  • या नोंदणीनंतर लगेचच मोबाइलवर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) येइल. ब्राऊजरच्या पेजवर मोबाइल क्रमांक आणि ओटीपी टाकून लॉगीन करावे आणि त्यानंतर मोबाइलमध्ये वाय-फाय यंत्रणा सुरू होईल.
  • या नोंदणीसाठी ऑनलाइनद्वारेच शंभर रुपये शुल्क आकारण्यात येणार आहेत.