अंबरनाथ : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश असताना दुसरीकडे पुन्हा एकदा बांगलादेशी नागरिकांविरूद्धची मोहिम पोलिसांनी सुरू केली आहे. अंबरनाथ शहरातून ९ तर उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी भागातून ४ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे.
पाकिस्तानी नागरिकांसह बांगलादेशी नागरिकांविरूद्धची शोध मोहिम यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. यापूर्वीही उल्हासनगरात बांगलादेशी नागरिकांविरूद्ध कारवाई करण्यात आली होती.
गेल्या काही वर्षात उल्हासनगर, विठ्ठलवाडीसह अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात बेकायदा चाळी आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये परदेशी नागरिकांचे बेकायदेशीर वास्तव्य असल्याचे दिसून आले होते. नेवाळी, मंलगगड, उल्हासनगर, अंबरनाथच्या काही भागातून बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. यातील अनेक जण मोलमजूरी करत वास्तव्य करत असल्याचे दिसून आले होते.
महिनाभरापूर्वी झालेल्या बांगलादेशी विरोधी कारवाईनंतर आता पुन्हा एकदा बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांविरूद्ध उल्हासनगरच्या परिमंडळ चारच्या पोलिसांनी कारवाईला गती दिली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशशासह राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना तातडीने भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे परिमंडळ चारच्या पोलिसांनी अंबरनाथ, उल्हासनगरसह आसपासच्या भागात शोध मोहिम सुरू केली. या कारवाईत आतापर्यंत १३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतल्याची माहिती परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.
उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुर्शीद मंडल आणि सपना खान यांना ताब्यात घेतले आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मुक्ती बोहरा, रत्ना खान यांना ताब्यात घेतले आहे. तर अंबरनाथ पश्चिम भागातील चिखलोली परिसरातून आलामीन शेख, आलीनूर बिस्वास, अरीफुल शेख, रब्बी शेख, शबोना खान, मनीर सरदार, आफिया सदल, नर्गीस शेख, हाफिजा मुल्ला अशा नऊ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांकडे कोणतेही अधिकृत कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याबद्दल त्यांच्याविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.