अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी तब्बल नऊ कोटी ८९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून सहा महत्त्वाच्या रस्त्यांचे काम केले जाणार आहे. या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह कंत्राटदारावर पुढच्या दोन वर्षांची देखभाल दुरूस्तीचीही जबाबदारी असणार आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचे रस्ते मिळण्याची आशा व्यक्त होते आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ हे तालुके सध्या नागरिकरणात सर्वात आघाडीवर आहेत. या तालुक्यातील शहरांमध्ये वाहतुकीचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्याचवेळी ग्रामीण भागातही रस्ते काँक्रिटकरण, रूंदीकरणाची कामे केली जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही शहराच्या धर्तीवरच रस्त्यांची उभारणी होते आहे. त्यात कल्याण, अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्या आघाडीवर आहे. या सर्वच तालुक्यांमध्ये ग्रामीण भागातही काँक्रिट रस्त्यांची कामे सुरू आहेत.

अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यात खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून रस्त्यांच्या मजबुतीकरणाची कामे केली जात आहेत. याचाच भाग म्हणून नुकताच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून अंबरनाथ तालुक्यातील सहा महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. एकूण नऊ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. नऊ कोटी ८९ लाख रुपये खर्चातून हे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. यात पुढील दोन वर्ष रस्त्यांची देखभाल दुरुस्ती समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते काँक्रिटीकरण नंतर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सुद्धा कंत्राटदारावर असेल.

या मार्गांचा समावेश

या मार्गात अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील महत्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे. यात गोरपे ते मंगरूळ हा रस्ता समाविष्ट करण्यात आला आहे. सोबतच कुंभार्ली जोड रस्ता, करवले – पोसरी ते काकडवाल रस्ता, करवले – नाऱ्हेण उत्तर शिव रस्ता, ढवळे ते कातकर वाडी रस्ता या रस्त्यांचा समावेश आहे. अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहराच्या वेशीवर असलेल्या ढोके ते दापिवली या रस्त्याचाही यात समावेश करण्यात आला आहे. या भागात शेतघरांची संख्या गेल्या काही दिवसात वाढली असून वर्दळही वाढली आहे. या गावासाठीही हा रस्ता महत्वाचा आहे.