तातडीच्या दुरुस्तीचा निर्णय
ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन नाटय़गृहातील बांधकाम तपासणीचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी तज्ज्ञांनी व्यवस्थापनाला सादर केला असून त्यामध्ये बांधकाम दुरुस्तीची कामे करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शनिवारपासून पुढील दहा दिवस नाटय़गृहातील सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.
ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन नाटय़गृहामधील मुख्य सभागृहाच्या छताचे प्लॅस्टर कोसळल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून व्यवस्थापनाने गेल्या दोन दिवसांपासून नाटय़गृहातील कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच गुरुवारी तज्ज्ञांना पाचरण करून नाटय़गृहाच्या बांधकामाची पाहणी केली होती. या पाहाणी अहवालानंतरच नाटय़गृह कार्यक्रमांसाठी खुले करण्याबाबतचा निर्णय व्यवस्थापन घेणार होते.
दरम्यान शुक्रवारी सायंकाळी तज्ज्ञांनी नाटय़गृहातील बांधकाम तपासणीचा अहवाल व्यवस्थापनाला सादर केला. या अहवालामध्ये बांधकाम दुरुस्तीची कामे सुचविण्यात आली आहेत. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी नाटय़गृह पुढील दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. शनिवारपासून नाटय़गृहातील बांधकाम दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.