ठाणे : शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह मे महिन्यात खुले होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, अंतिम टप्प्यातील कामे अद्याप पुर्ण झालेली नसून ही कामे मे महिनाअखेर पुर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे नाट्यगृह जून महिन्यातच खुले होण्याची चिन्हे आहेत.ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे. हे ठिकाण शहराचे सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. १९८० मध्ये या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली असून नाट्यगृहाचे बांधकाम जुने झाले होते. यामुळे नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आणि त्यानुसार नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचे कामही सुरू केले.

या कामासाठी राज्य शासनाने पालिकेला निधीही दिला आहे. गेले सात महिने हे नाट्यगृह दुरुस्ती कामासाठी बंद असून ही दुरुस्तीची कामे मे महिन्यात पुर्ण होऊन १५ मे पर्यंत नाट्यगृह खुले होईल, अशी शक्यता पालिकेने वर्तविली होती. मात्र, नाट्यगृहाच्या बाहेरील काही अंतिम टप्प्यातील कामे अद्याप पुर्ण झालेली नसून ही कामे मे महिनाअखेरपर्यंत पुर्ण होण्याची शक्यता आहे. या कामानंतर नाट्यगृह खुले होऊ शकणार आहे. यामुळे नाट्यगृह खुले होण्यासाठी जूनपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

नाट्यगृहात १ हजार १७ व्यक्ती बसू शकतील, इतकी आसन क्षमता होती. जुन्या खुर्च्या आकाराने छोट्या आणि एैसपैस नव्हत्या. यामुळे जुन्या खुर्च्या काढून त्याठिकाणी नवीन एैसपैस खुर्च्या बसविण्यात आल्या आहेत. यामुळे आसन क्षमता ५० ते ६० खुर्च्यांनी कमी झाली आहे. नाट्यगृहाच्या बाहेरील बाजूस उदवाहक बसविण्यात आली असून या उदवाहकाच्या काचेतून नागरिकांना तलावपालीचे विहंगमय दृश्य पाहता येणार आहे.

अग्नि रोधक पडदा

नाट्यगृहामध्ये ४७ वर्षांपुर्वी व्यासपीठावर बसविण्यात आलेला पडदा जुना जीर्ण झाल्यामुळे तो बदलण्यात येणार होता. जुन्या पडद्याप्रमाणेच नवीन पडदा तयार करण्यात येणार होता. त्यावर जुन्या नक्षीकामाची झलक दिसेल, अशा स्वरुपाचा पडदा तयार करून घेण्यात येणार होता. असा पडदा तयार करण्यासाठी २२ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव संबंधितांनी दिला होता. मात्र, हा खर्च कमी करावा यासाठी पालिका आग्रही होती. मात्र, त्यात काहीच तडजोड होत नसल्यामुळे पालिकेने अखेर अग्निरोधक पडदा विकत घेतला असून यासाठी पालिकेला ७ लाख रुपये खर्च आला आहे. नाट्यगृहात अग्निरोधक पडदा असणे बंधनकारक असून त्याचबरोबर नक्षीकाम पडद्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत असल्यामुळे अग्निरोधक पडदा खरेदी केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.