डोंबिवली जवळील संदप गावात गेल्या सप्ताहात खदानीत बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. या कुटुंबियांचे सांत्वन आणि त्यांना ५० हजार रूपयांची आर्थिक मदत करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले बुधवारी संदप गावात आले होते. मंत्री आठवले यांनी मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांना ५० हजाराची मदत जाहीर करताच, कुटुंबियांनी ‘आम्हाला तुमची मदत नको. पहिले पाणी द्या. उलट आम्हीच तुम्हाला ५० हजार रूपये देतो,’ अशा कठोर शब्दात सुनावले.
मागील पाच वर्षापासून गावात पाणी नाही. पाणी टंचाईमुळे लोकांना गावाबाहेरील पाणवठ्यावर अवलंबून राहावे लागते. पाणी टंचाईमुळे आमच्या कुटुंबातील पाच जण मरण पावले. आमदार, खासदार येतात आश्वासन देतात आणि निघून जातात. पाणी प्रश्न जैसे थे आहे. आता तुम्ही येऊन मदत देत असाल तर तुमची मदत अजिबात नको. पहिले पाणी द्या, अशा शब्दात गायकवाड कुटुंबातील सदस्याने मंत्री आठवले यांना सुनावताच वातावरण तप्त झाले.

पोलिसांनी संतप्त सदस्याला बाजुला केले. तो तावातावने आठवले यांना सुनावत होता. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे प्रल्हाद जाधव, अंकुश गायकवाड उपस्थित होते. संदप गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी बोलू. मुख्यमंत्री निधीतून गायकवाड कुटुंबातील सदस्यांना मदत मिळेल यासाठी पत्र लिहीणार आहे. गाव परिसरातील खदानी बुजून टाका, असे शासनाला कळविले आहे, असे आठवले यांनी सांगितले.
गायकवाड कुटुंबीयांचे सांत्वन करताना कुटुंबीय मदतीवरून भडकल्याने तेथे फार न वेळ न थांबता आठवले यांनी काढता पाय घेतला.