ठाणे : मुंबई येथील वरळी भागातील एनएससीआय डोम येथे शिवसेना (ठाकरे) आणि मनसेचा हिंदी सक्ती आदेश रद्दच्या निर्णयाचा विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीचे संकेत दिले असून त्यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर टिका केली. त्याला मनसे नेते गजानन काळे यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट करत प्रतिउत्तर दिले आहे. शेलार मामाला पोटदुखी सुरू झाली आहे..,अशा आशयाची ही पोस्ट असून ती चर्चेचा विषय बनली आहे.
मराठी भाषेवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापले आहे. हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आयोजित केलेला विजयी मेळावा शनिवारी वरळीत पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने सुमारे दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र आले होते.
या मंचावरून भाषण करताना दोन्ही ठाकरे बंधूंनी सरकारवर टिका केली. तसेच या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीचे संकेत दिले असून त्यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. भाषेसाठी नाही, ही तर निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी असल्याचे म्हणत भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता ‘भाऊबंदकी’ आठवल्याची टीका शेलार यांनी केली आहे. भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच आणि ते यांच्या लेखी नाहीच.
महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार, त्यासाठी सत्ता…यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब तहात जिंकण्याचा प्रयत्न”, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. त्याला मनसे नेते गजानन काळे यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट करत प्रतिउत्तर दिले आहे.
शेलार मामाला पोटदुखी सुरू झाली आहे, असे म्हणत गजानन काळे यांनी आशिष शेलार यांना टोला लगावला आहे. निवडणुका आणि सत्तेसाठी भाजपाने उलट्या सुलट्या युत्या केलेल्या चालतात, पक्ष फोडलेले चालतात, भ्रष्टाचाऱ्यांना शुद्ध करून भाजपात घेतलेले चालते. कुटुंब फोडून राजकारण केलेलं चालतंय मात्र मराठी आणि महाराष्ट्रासाठी दोन ठाकरे यांनी एकत्र आले की यांना अपचन होते. अरे जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, असे काळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.