गणेशमूर्तीनाही जीएसटीचा फटका

मूर्तीची किंमत गेल्या वर्षी १७०० रुपये होती ती यंदा २१०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

ganesh idol
मूर्तीची किंमत गेल्या वर्षी १७०० रुपये होती ती यंदा २१०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

किमतीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ

गणेशोत्सवाच्या तयारीचे वेध लागताच मूर्तीच्या किमतीतील चढउतारावर सर्वसामान्य भक्तांचे लक्ष असते. मात्र यंदा प्लास्टर ऑफ पॅरिस आणि ऑइल पेंट यांसारख्या वस्तूंवर जीएसटी लागू झाल्याने गणपतीच्या मूर्तीच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यंदा गणेशाचे आगमन ऑगस्टच्या चौथ्या आठवडय़ात होणार आहे. त्यामुळे गणेशमूर्ती बनवणाऱ्या शाळांमधली कारागिरांची लगबग वाढली असून मंडळांच्या मागणीनुसार शाडूच्या मातीच्या, प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून मूर्तीची कलाकृती तयार करणं, रंगरंगोटी अशा कामांना वेग आला आहे. एक फुटाच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची किंमत गेल्या वर्षी १७०० रुपये होती ती यंदा २१०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या किमतीमध्ये दर वर्षी वाढ होत असली तरी जीएसटी हे यंदाच्या भाववाढीचे मुख्य कारण असल्याचे मूर्तीविक्रेत्यांनी सांगितले. कारागिरांच्या मजुरीतही वाढ होत असल्याचे या विक्रेत्यांनी सांगितले.

जसा ट्रेंड बदलत जातो त्यानुसार गणेशमूर्ती बदलणाऱ्या गणेशभक्तांना हव्या त्या प्रकारची आणि आकारातली गणेशमूर्ती उपलब्ध करण्यात येत आहेत. सध्या सिद्धिविनायकाच्या रूपातील, पंचमुखी रूपातील, बालगणेशमूर्ती आणि गेल्या वर्षांपासून नवीन आलेल्या पेशवा गणेशमूर्तीना विशेष मागणी आहे. परंतु त्याच बरोबर पारंपरिक गणेशमूर्ती म्हणजेच गणपतीच्या हाती पाश, अंकुश, मोदक व एका हाताने भक्तांना आशीर्वाद देण्याची मुद्रा असणाऱ्या मूर्तीनादेखील तितकीची मागणी आहे. तसेच यंदा विठ्ठलाच्या रूपातील आणि सोबत वारकरी असलेला रूपातील गणेशमूर्तीना खास मागणी असल्याचे वसईतील मूर्तिकार जितंद्र राऊत यांनी सांगितले. गणेशमूर्तीची मागणी मुंबई, सुरत आणि वसई तालुक्याच्या विविध ठिकाणांहून असते.

तशी दर वर्षी गणेशमूर्तीच्या किमतीत वाढ होते; परंतु जीएसटी मुळे पाच टक्के जास्त वाढ झाली आहे.

-नितीन पाटील, मूर्तिकार, वसई, पापी

पाच टक्क्यांनी वाढ

* प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या किमती- २५ ते ३० टक्क्यांनी वाढ

* शाडूच्या मातीच्या मूर्तीच्या किमती-३५ ते ४० टक्क्यांनी वाढ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ganesh idol cost prices increased by 25 to 30 percent due to gst