Ganesh Naik Janata Darbar Thane: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात भाजप नेते व वनमंत्री गणेश नाईक यांचा गुरुवारी जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. नाईक हे यापूर्वी गडकरी रंगायतनमध्ये जनता दरबार भरवायचे पण, गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी बंद झालेला जनता दरबार घेण्यास सुरुवात केली असली तरी गडकरी रंगायतन दुरुस्ती कामामुळे त्यांना इथे दरबार घेणे शक्य झाले नव्हते. दरम्यान, नाईक यांचा बऱ्याच वर्षांच्या अंतरानंतर येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.

गणेश नाईक यांचा जनता दरबार गुरुवारी सकाळी राम गणेश गडकरी रंगायतन, येथे सुरु झाला आहे. यात ते नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाणे शहर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. याठिकाणी भाजपने नाईक यांची पक्षाच्या संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केली असून तेव्हापासून ते ठाण्यात अधिक सक्रिय झाले आहेत. त्यांच्या जनता दरबाराच्या निमित्ताने ठाणे शहराच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हालचाली वाढल्या आहेत.

या जनता दरबारामध्ये नागरिकांच्या विविध शासकीय, प्रशासकीय तसेच स्थानिक स्तरावरील तक्रारी, निवेदने आणि समस्या ऐकून त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत. नागरिकांना त्यांच्या समस्या थेट मंत्री नाईक यांच्यासमोर मांडण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. या कार्यक्रमासाठी विशेष सूचना देण्यात आली होती. गुरुवार, सकाळी ८ वाजल्यापासून गडकरी रंगायतन येथे टोकन वितरण सुरू करण्यात आले होते. नागरिक येथे येऊन टोकन घेत होते. जनता दरबारास येताना नागरिकांनी आपली लेखी निवेदने तीन प्रतींमध्ये तयार करून आणावीत. तसेच आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सोबत ठेवावेत, जेणेकरून अर्जावर योग्य ती कार्यवाही करणे सुलभ होईल, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते.

या जनता दरबारामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होईल, तसेच स्थानिक पातळीवरील समस्यांचे निराकरण जलद गतीने होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाणे परिसरातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी थेट व्यासपीठ उपलब्ध झाली.