ठाणे : आजच्या परिस्थितीत सिस्टममुळे अन्याय करणाऱ्याला कदाचित शिक्षा मिळणार नाही. मात्र वरच्या दरबारात कोणी सुटत नाही, तिथे शिक्षा मिळेल, असे वक्तव्य राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणावर बोलताना केले. राजकीय संघर्ष हा राजकीय पातळीवरच असायला हवा, तो जीव घेणारा संघर्ष नसावा, असे त्यांनी म्हटले.

राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी शुक्रवारी सायंकाळी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या नंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना या प्रकरणावर भाष्य केले. प्रदीप पूर्णेकर हे कोणत्या पक्षाचे होते, यापेक्षा ते सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या हत्येप्रकरणी कुटुंबीयांनी काही गंभीर बाबी मांडल्या आहेत. अनेक जणांना अटक झाली असून या प्रकरणाचा खोलवर तपास सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे तपासातून खरे गुन्हेगार समोर येतील आणि त्यांना कायद्यानुसार शिक्षा होईल, असा विश्वास मंत्री नाईक यांनी व्यक्त केला.

अन्यायाविरुद्ध संघर्ष असतो, रस्त्यावरचा संघर्ष असतो. राजकीय संघर्ष असतो पण, अशा प्रकारे जीव घेणं हा संघर्ष समाजासमोर आदर्श निर्माण करणारा नाही. म्हणून या गोष्टीचा निषेध करावा तेवढाच थोडा आहे, असेही ते म्हणाले. या प्रकरणात कोणी सूत्रधार असेल तर त्यालाही कायद्याच्या कक्षेत आणून शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सांत्वनासाठी एकदा कुटुंबीयांची भेट घेतल्याने त्यांचे दुःख कमी होणार नाही. या कुटुंबाला न्याय मिळणे महत्त्वाचे आहे, असे नाईक म्हणाले. पूर्णेकर यांच्याशी शिवसेनेत असल्यापासून आपले संबंध होते, असेही नाईक यांनी सांगितले. हत्येमागे विकासकामांशी संबंधित मुद्दे तसेच ड्रग्जशी संबंधित कारणांचाही उल्लेख होत असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, नेमके कारण तपासातूनच स्पष्ट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

वरच्या दरबारात कोणी सुटत नाही

शेवटी सत्य कधी ना कधी उजेडात येते. आजच्या परिस्थितीत सिस्टममुळे अन्याय करणाऱ्याला कदाचित शिक्षा मिळणार नाही. मात्र वरच्या दरबारात कोणी सुटत नाही, शिक्षा मिळेल,’ असे सूचक वक्तव्य नाईक यांनी केले.