ठाणे : भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात जीवे मारण्याची धमकी आणि बलात्कारप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे न्यायालयात धाव घेतली होती. यातील जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणातील अर्जावर २७ एप्रिलला सुनावणी होणार आहे, तर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग करण्याची विनंती मुख्य न्यायाधीशांकडे केली आहे. त्यामुळे लैंगिक अत्याचार प्रकरणाची सुनावणी कोणत्या न्यायाधीशांकडे घेतली जाईल, हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.

नाईक यांच्याविरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यावरून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात नाईक यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी  अर्ज केले होते. त्यावर बुधवारी सुनावणी घेण्यात आली. लैंगिक अत्याचार प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांच्या न्यायालयात झाली. अंतरिम सुनावणी घेतल्यानंतर न्यायाधीश जाधव यांनी हे प्रकरण दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग करण्याकरिता मुख्य न्यायाधीशांकडे पत्र पाठविले आहे. तर पीडित महिलेच्या वकील लुसी मासी, अजय वरेकर, अजय बामणे यांनीही या दोन्ही प्रकरणांची सुनावणी एकाच न्यायाधीशांनी घ्यावी, असे विनंती पत्र मुख्य न्यायाधीशांकडे पाठविले आहे. तर धमकी प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्या न्यायालयात झाली.

गणेश नाईक हे भाजपेचे नेते आहेत. नाईक यांच्या विरोधकांच्या आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या दबावामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तीवाद गणेश नाईक यांच्या वकिलांनी केला.