ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (यूडीसीपीआर) ही योजना आखली होती. त्यांची योजना वेगळी आणि चांगली होती. कालांतराने ती योजना बदलण्यात आली. परंतु आता जी योजना लागू करण्यात आली आहे, त्यात एफएसआयची खैरात करण्यात आल्याने शहरांचा विचका होणार आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय चुकीचा होता आणि ही योजना भ्रष्टाचाराचे कुरण आहे, असा गंभीर आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला. ते ‘लोकसत्ता लोकसंवाद’ उपक्रमात बोलत होते.
सध्याची यूडीसीपीआर ही योजना नेमकी कोणत्या शहाण्याने तयार केली, असा माझा प्रश्न असून हे मी ज्या ठिकाणी सांगायचे, त्याठिकाणी सांगितले आहे. पूर्वी मुंबईत एकच चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिला जात होता. कोणी साधी गॅलरी जरी काढली, तरी एनजीओ आणि नागरिक त्याविरोधात उभे राहत होते. म्हणूनच मुंबईचे एक वेगळे महत्त्व होते. परंतु यूडीसीपीआरमुळे आज एफएसआयही खैरातीसारखा वाटला जात आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. उद्या जेव्हा या शहरांमध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहतील, तेव्हा पूर्ण परिसरच इमारतींनी भरून जाईल. मोटरसायकल चालवणेही अशक्य होईल. एक-दोन नव्हे, तर अनेक उन्नत रस्ते करावे लागतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
नवी मुंबई शहर हे सुंदर आहे आणि राहण्यायोग्य शहर आहे. मात्र ज्या दिवशी यूडीसीपीआरचा हा एफएसआय पूर्ण वापरला जाईल, त्या दिवशी या शहरामध्ये कोणीही राहू इच्छिणार नाही. इतके प्रेम असतानासुद्धा मी स्वतः वाडा, मोखाडा, जव्हार किंवा मुरबाड भागात राहायला जाण्याचा विचार करेन. कारण जे वातावरण निर्माण होईल, ते केवळ हव्यासातून निर्माण झालेले असेल. काहींना पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा हव्यास आहे. यामुळेच जीवनाच्या अंतिम टप्प्यावर हेच लोक इतके पश्चात्ताप करतील की अंधाराचा कोपराही त्यांना माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.
‘आमच्यानंतर कोणीच राजा नाही’
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची लाॅटरी लागली, हे मी यापूर्वीही बोललो होतो आणि आजही बोलतो. यात गैर काहीच नाही. त्या काळात संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला वाटत होते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. मात्र जे काही घडले आणि त्यानंतर ज्या पद्धतीने राज्यकारभार झाला, तो सर्वांनी पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे सर्व अधिकार असूनही त्यांनी अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून सहकार्याने निर्णय घेतले. दुसऱ्यांची मत विचारात घेतली. परंतु आज काही जणांना वाटते की, आमच्यानंतर कोणीच राजा नाही, असा टोलाही त्यांनी शिंदे यांना लगावला.
‘सरकारचा निर्णय चुकला’
पाणीपुरवठा, निसर्ग, वाहतूक, आरोग्य सेवा, उद्याने अशा पायाभुत सुविधांचा सखोल अभ्यास न करताच यूडीसीपीआर योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु सरकारचा हा निर्णय चुकला. कारण या निर्णयामागे जनतेची सोय नव्हे, तर स्वतःचे राजकारण, स्वतःचे बंगले आणि इमारती उभारण्याचा स्वार्थ आहे. या योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. केवळ टोलेजंग इमारती उभ्या करून काय साध्य होणार आहे. इतक्या लोकसंख्येला पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण व्यवस्था कशी देणार, असे विचारले होते. त्यांनी आणलेली योजना चांगली होती. पण ती बदलण्यात आली. या योजनेमुळे शहराचा पूर्ण विचका होणार आहे, असे नाईक म्हणाले.
‘त्यांची जागा कारागृहात’
२०२९ नंतर ‘होत्याचे नाहीसे होईल.’ जनतेला माहीत आहे प्राबल्य कुठून आणि कसे आले. पैसा कमवा पण कोणत्या मार्गाने आला, त्याचा मार्ग जनसामान्यांना पटवून द्या. नवी मुंबईत सध्या गैरमार्गाने आलेल्या पैशाचे वाटप होत आहे. नवी मुंबईतील जनता सुजान आणि स्वाभिमानी आहे, हा पैसा जनता घेणार नाही. यांच्या पैशांच्या स्रोताचा शोध घेतला तर यांची जागा कारागृहात असेल. यांचे आजचे मरण उद्याला आहे. स्वत:च्या गळ्याभोवती फास यांनीच बांधला आहे, अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली.
विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव हे फक्त लोकनेते दि. बा. पाटील यांचेच दिले जाणार आहे. या विमानतळाच्या उद्घाटनावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात दि. बा. पाटील यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. केंद्रीय नेतृत्वाबरोबरही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली आहे. देशात नवी मुंबईप्रमाणे अजून सात विमानतळांना नामकरण करण्याचे शिल्लक आहे. टर्मिनल नव्हे, तर संपूर्ण विमानतळालाच दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार याची आम्हाला खात्री असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
