ठाणे: मुंब्र्यातील एमआयएम पक्षाची नवनिर्वाचित तरुण नगरसेविका सहर शेख महापालिका निवडणुका पार पडल्यापासून प्रचंड चर्चेत आहे. तिने तिच्या विजया नंतर सभेत बोलताना “पुढच्या निवडणुकीत संपूर्ण मुंब्र्याला हिरवं करून टाकू ” असं वक्तव्य केलं होत. या वक्तव्यातून तिने आमदार जितेंद्र आव्हाड यांना टोला लागवला होता. तीच हे वक्तव्य समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. तिच्या या वक्तव्यावरून आता वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मुंब्र्याला हिरवं करून टाकू ” या वक्तव्यावरून नगरसेविका सहर शेख प्रचंड ट्रोल झाली. त्यानंतर, तिच्या या वक्तव्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सहर शेखच्या चौकशीचा अहवाल सादर केला. त्यात ‘अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है’ या वक्तव्याबद्दल तिने २३ जानेवारी २०२६ रोजी माफीनामा दिल्याचे स्पष्ट केले होते. परंतू, ‘मी माफीनामा दिलेला नाही तर, त्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मुंब्रा येथे झालेल्या सभेत वापरलेले वाक्य हे पक्षाच्या झेंड्याबाबत होते. असे विधान सहर शेख हिने केले होते.
या सर्व राजकीय नाट्यानंतर आता वनमंत्री गणेश नाईक यांनी सहर शेखच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी सहर शेखची एकप्रकारे बाजू मांडली आहे असेच दिसते.
काय म्हणाले गणेश नाईक…?
नगरसेविका सहर शेख ने केलेल्या “मुंब्र्याला हिरवं करून टाकू ” या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, ” हिरवा म्हणजे पाकिस्तान चा हिरवा इथे आपण येऊ देणार नाही. आपल्या तिरंगामध्ये सुद्धा तीन रंग आहेत. भगवा, पांढरा आणि हिरवा. आता विचाराने त्यांच्या पक्षाच्या झेंड्याचा रंग हिरवा आहे. त्याचं आपण किती भांडवल करायचं ते करू शकतो. भांडवल हे सगळ्याच गोष्टीच करता येत. परंतू, हिरवा रंग बऱ्याच आणखी पक्षात सुद्धा आहे. या देशात मुघलांची सत्ता चालेल असं असतं तर आम्ही कधीच आव्हान स्विकारायला तयार आहोत. परंतू, ती नगरसेविका तिच्या पक्ष्याच्या अनुषंगाने बोलली. जसं आपण म्हणतो भगवमय करू तसं ती बोलली हिरवमय करू. आपल्या तिरंग्या मध्येही हिरवा आहेच की, त्यामुळे हिरव्या सोबत आपण दुष्मनी नाही घेऊ शकत. मुघलांच्या हिरवेपणाचा आपण तिरस्कार करतो आणि त्याच्याशी सामना देखील करू, असे नाईक म्हणाले.
