“भाजपाने परवानगी दिली, तर यांचे नामोनिशाण संपवून टाकू. मी आज परत बोलतो आहे,” असा थेट इशारा देत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना डिवचले. ठाणे, कल्याण डोंबिवली येथे पक्षाने आदेश दिला म्हणून आम्ही ते मान्य केले. मनाला पटले नसले तरीही कार्यकर्त्यांनी सहन केले. पक्ष नेतृत्वाचा निर्णय आम्ही मान्य केला. असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. मात्र याबाबत जहरी प्रतिक्रिया देत शिवसेना (शिंदे) महिला प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी गणेश नाईक यांना लक्ष्य केले आहे. गणेश नाईक तुम्ही औकातीत राहा. तुमची ख्याती ही फक्त पक्ष, कपडे आणि बायका वारंवार बदलण्यासाठी आहे. राजकारणतले अण्णा नाईक म्हणजे भाजपाचे गणेश नाईक, अशी जहरी टीका ज्योती वाघमारे यांनी केली आहे.राज्यातील महापालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडल्या. या निवडणुकांपूर्वीच नवी मुंबईत मंत्री गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे असा राजकीय ‘सामना’ रंगला होता. यामध्ये गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका केली होती. भाजपाने परवानगी दिली तर एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करून टाकू आणि घोडे पण पलटी करून टाकू अशी थेट टीका केली होती. निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर हा वाद संपेल, असे वाटत असतानाच आता हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आक्रमक विधान केले आहे. यावेळी नाईक म्हणाले की
“एके काळी मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे लढू द्यावे. निवडणुकीनंतर ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून येतील, त्यांना मित्र पक्षांनी पाठिंबा द्यावा आणि उर्वरित पदांची वाटणी करावी, असे माझे मत होते. मी ही बाब मुख्यमंत्र्यांना सांगितली होती. त्यांनी त्यावर होकार दिला नाही आणि नकारही दिला नाही. आम्हाला अपेक्षा होती की कार्यकर्त्यांना संधी मिळेल, मात्र काही ठिकाणी ती संधी मिळाली नाही,” असे नाईक म्हणाले. मात्र आम्ही पक्ष आदेश पाळला आणि निवडणूक लढविल्या. मात्र आताही भाजपाने आदेश दिला तर त्यांचे नामोनिशाण मिटवून टाकू अशी ठिकाण गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता केली आहे. यामुळे मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याबाबत शिवसेनेकडून देखील गणेश नाईक यांना आता लक्ष्य केले जात आहे.
काय म्हणाल्या ज्योती वाघमारे ?
एकनाथ शिंदे यांच्या विषयी काही बोललात तर तुमच्या अब्रूचे धिंडवडे काढू. एकनाथ शिंदे यांचे नामोनिशाण मिटवून टाकणारा अजून जन्माला यायचा आहे. गणेश नाईक औकातीत राहा. तुमची ख्याती ही फक्त पक्ष, कपडे आणि बायका वारंवार बदलण्यासाठी आहे. ज्यांच्यावरती बलात्काराचे आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत, जे स्वतःच्या मुलाला पितृत्वाचं नाव देऊ शकत नाही, त्यांनी आमच्यावरती बोलू नये. ज्यांचे फक्त रात्रीस खेळ चालतात. ते राजकारणातले अण्णा नाईक म्हणजे गणेश नाईक. अशा नाईकांचे सर्व काळे धंदे बाहेर काढल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही. अलीकडे गणेश नाईकांचा एकच धंदा झाला आहे. उठायच आणि एकनाथ शिंदे यांच्यावर भुंकायचे. मात्र हाथी चले बाजार, कुत्ते भोके हजार..अशी तुमची अवस्था आहे. भाजपच्या नेत्यांना देखील आवाहन आहे त्यांनी लवकरात लवकर या राजकारणातल्या भटक्या कुत्र्यांची राजकीय नसबंदी करा. नाहीतर या भटक्या कुत्र्यांचा महापालिकेच्या गाडीत टाकून कसा बंदोबस्त करायचा हे आम्हा लाडक्या बहिणींना चांगलेच माहिती आहे. अशी जहरी टीका ज्योती वाघमारे यांनी केली आहे.
