scorecardresearch

‘मी शिवसेना बोलते’, शिंदे गटाविरोधातील देखावा पोलिसांकडून जप्त; महाआरती करत गणेशोत्सव मंडळाने नोंदवला निषेध

या मंडळाच्यावतीने दरवर्षी वर्षातील एखाद्या महत्वाच्या चालू घडामोडीवर देखावा साकारला जातो. यावेळी दोन महिन्यापूर्वी शिवसेनेत घडलेले बंडखोरी नाट्य विषयावर आधारित देखावा तयार करण्यात आलेला.

‘मी शिवसेना बोलते’, शिंदे गटाविरोधातील देखावा पोलिसांकडून जप्त; महाआरती करत गणेशोत्सव मंडळाने नोंदवला निषेध
पोलिसांनी देखावा हटवल्यानंतर महाआरती

कल्याण पश्चिम येथील रामबाग विभागात विजय तरुण गणेशोत्सव मंडळाने दोन महिन्यापूर्वी शिवसेनेत घडलेल्या बंडखोरी नंतर राज्यात सत्ता स्थापन झालेल्या घडामोडींवर चलतचित्रद्वारे “मी शिवसेना बोलते’ असा देखावा उभा केला होता. या देखाव्यामुळे कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवून पोलिसांनी आक्षेप घेत या देखाव्यावर बुधवारी पहाटे चलचित्र देखाव्याचे साहित्य जप्त केले. मखरात गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई केल्यामुळे शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी विजय तरुण मंडळाचे कार्यकर्ते, या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, महानगर प्रमुख विजय साळवी, शहर प्रमुख सचिन बासरे, ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास, शरद पाटील यांनी विजय तरुण मंडळाच्या मखरा समोर गुरुवारी संध्याकाळी महाआरती केली.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा देखावा उभा केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली आहे.

कल्याण पश्चिम भागातील रामबाग भागात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थक कल्याण- डोंबिवली महानगरप्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी यांचे विजय तरुण गणेशोत्सव मंडळ आहे. ते या मंडळाचे विश्वस्त आहेत. या मंडळाच्यावतीने दरवर्षी वर्षातील एखाद्या महत्वाच्या चालू घडामोडीवर गणेशोत्सवात देखावा साकारला जातो. यावेळी दोन महिन्यापूर्वी शिवसेनेत घडलेले बंडखोरी नाट्य विषयावर आधारित एक देखावा विजय तरुण गणेशोत्सव मंडळाने चलतचित्र माध्यमातून उभा केला होता. ही माहिती पोलिसांना समजताच त्यांनी या देखाव्यावर आक्षेप घेतला. सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त या ठिकाणी अनेक भाविक गणेशाच्या दर्शनाबरोबर देखावा पाहण्यासाठी येतील. मात्र आक्षेपार्ह देखावा असल्याने तेथे कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता असल्याने पोलिसांनी हा देखावा जप्त करून पोलीस ठाण्यात जमा केला आहे.

या मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत संताप व्यक्त केला. साळवी यांनी सांगितले, वास्तविक देखाव्यात काही आक्षेपार्ह नव्हते. मात्र तरीही पोलिसांनी पहाटेच्या सुमारास घाईघाईने येऊन कारवाई केली. ही तर हिटलरशाही आहे, हुकूमशाही आहे, आम्ही या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार आहोतच, शिवाय या कारवाईचा निषेध म्हणून आम्ही गणपती बाप्पाच्या मंडपात गणेशमूर्तीची स्थापना करणार नाहीत. पोलिसी कारवाईच्या या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच शिवसैनिका या घटनेमुळे संतप्त झाले आहेत.

महाआरती

पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी विजय तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांसह शहरातील अनेक नागरिक ज्येष्ठ शिवसैनिक गुरुवारी संध्याकाळी विजय तरुण मंडळाच्या मंडपा समोर जमा होऊन त्यांनी महाआरती म्हणून शासन आणि पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला.

मी शिवसेना बोलते देखाव्यातील व्हॉइस ओव्हरमध्ये नेमकं काय म्हटलं आहे….

‘मी प्रबोधनकारांच्या संकल्पनेतून आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेतून निर्माण झाले आहे. उध्दव ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या सारख्या अनेकांनी कठोर परिश्रम घेऊन मला वाढविले आहे. त्यामुळे माझा महावृक्ष झाला आहे. हे घडत असताना अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. अनेकांनी रक्त सांडले आहे. काहींनी कारावास भोगला आहे. अनेक दिग्गजांनी मला वाढविण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. खासदार, आमदार, नगरसेवक, लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या मुळांमुळे घडले आहेत. घडत आहेत. शिवसेनारुपी या महाकाय वटवृक्षावर आता फळे लगडली आहेत. ही फळे परिपक्व झाल्याचे दिसताच, आता इतर राजकीय पक्षांचे व्यापारी, पुढारी फळांचा भाव करुन माझ्या पासून हिरावून नेत आहेत. त्या व्यापाऱ्यांना शिवसेनारुपी महाकाय वटवृक्ष सांगू इच्छितो, की शिवसैनिक रुपी घट्ट मुळांवर हा महाकाय वृक्ष घट्ट पाय रोवून अखंडपणे उभा राहणार आहे. माझ्याशी गद्दारी करणाऱ्यांना मी गाडून टाकणार आहे.

हे गणराया, माझ्या शिवसैनिकांना या स्वार्थी गद्दारांशी लढण्याचे बळ दे आणि मला स्वार्थी मतलबी लोकप्रतिनिधी रुपी वादळाशी लढण्याची शक्ती दे.’
असा वटवृक्षातील शिवसेना रुपातील मानव गणेश मंडपात भक्तांशी संवाद साधत आहे.

मराठीतील सर्व ठाणे न्यूज ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ganesh utsava 2022 decoration of anti eknath shinde group titled me shivsena bolteya removed by police in kalyan scsg

ताज्या बातम्या