शहर शेती : गणपतीची पत्री व तिचे औषधी उपयोग

गणपतीला आपण जी पाने संमंत्रक वाहतो त्यांना पत्री म्हणतात. या पत्री औषधी गुणांनी युक्त आहेत.

गणपतीला आपण जी पाने संमंत्रक वाहतो त्यांना पत्री म्हणतात. या पत्री औषधी गुणांनी युक्त आहेत. या वनस्पती शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक व सार्वजनिक आरोग्य चांगले होण्यासाठी उपयुक्त आहेत. यात गवतापासून (दूर्वा) अतिप्राचीन भव्य अशा पिंपळ वृक्षापर्यंतच्या वनस्पती आहेत. या सर्वाची थोडक्यात माहिती करून घेऊ.
पिंपळ – अहोरात्र प्राणवायू देणारे वृक्ष. याचा प्रत्येक भाग औषधी आहे. पिंपळ बुद्धिवर्धक, रक्तशुद्धीकारक तसेच त्वचा, पोट व दंतविकारावर गुणकारी आहे. पिकलेली फळे खाल्ल्याने तोतरेपणा जातो. पिंपळाची साल दुधात उकळून उत्साहवर्धक पेय तयार होते. साल, केवळी व सुकी पाने व फळे औषधांत वापरतात.
बेल – दशमुलातील एक वनस्पती. आतडय़ांच्या आजारावर उत्तम, मुळे, पाने, कच्ची व पिकलेली फळे औषधात वापरतात. टॉन्सिल्सच्या आजारात पानांचा काढा उपयोगी, फळे शक्तिवर्धक, मेंदू व हृदयाच्या स्वास्थ्यासाठी शक्तिवर्धक आहेत. पिकलेल्या फळांचे सरबत शरीरातील उष्णता घालवितो. काटेरी वृक्ष, मुळे आडवी पसरतात. त्यामधून नवीन रोपे होऊ शकतात. घराजवळ लावता येते.
शमी – खैरासारखा बारीक पानाचा काटेरी वृक्ष राजस्थान व गुजरातच्या काही भागात कल्पवृक्ष समजला जातो. शरीरातील उष्णतेचा नाश करतो. साल उगाळून लावल्यास व्रण जातात. अतिसारावर झाडाची साल ताकात उगाळून देतात.
’दुर्वा – शीतल, रक्तस्कंधन, व्रणरोपण, मूत्रजनन, जखमेवर पानांचा लेप केल्यास रक्त वाहणे बंद होते. घोणा फुटल्यावर नाकात अंगरस घालतात. नागिणीवर दूर्वा वाटून लावतात व रस पोटात देतात. दाह कमी होतो. उष्णतेने शमन करणारी दूर्वा ही प्रमुख वनस्पती आहे.
’धोत्रा – यात काळा-पांढरा व राजधोत्रा असे तीन प्रकार आहेत. धोत्रा विषारी असतो. पांढरा धोत्रा पूजेत वापरतात. दमा, आकडी, फुफ्फुसाच्या नळ्या सुजणे, स्नायूंचे झटके यावर गुणकारी. धोत्र्याची पाने व खोड वाळवून नाकाने धूर घेतल्यास दम्यात आराम पडतो. धोत्रा विषारी आहे. याचे विषारी गुण योग्य पर्याप्त मात्रेत वापरल्यास ती औषधासारखी उपयोगी पडते अन्यथा घातक होऊ शकते.
’तुळस – घरगुती उपचारात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीच्या सौम्य, ज्वरघ्न, शीतहर, वातहर, कफघ्न, उत्तेजक व वायूनाशी असे धर्म आहेत. दुखणाऱ्या कानात तुळशीचा रस घालतात. पाने उष्ण धर्माची मात्र बी शीतकारक आहे. तुळशीची माती कीटकदंशावर उपयुक्त आहे. गजकर्णावर तुळशीचा रस लावतात, फायदा होतो.
’माका- भृंगराज- पावसाळ्यात बहुतेक ठिकाणी उगवतो. समोरासमोर पाने देठविरहित, छोटी पांढरी फुले, दिसायला सूर्यफुलासारखी. ही उष्ण वनस्पती आहे. हीचे श्वेत व पीत असे दोन प्रकार आहेत. तिच्यात पाचक, कृमिनाशक व कफनाशक असे गुण आहेत. याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. विंचू दंश,त्वचाविकार, मूळव्याध, कावीळ, सूज अशा अनेक विकारांवर ही वनस्पती गुणकारी आहे.
’बोर – भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असते. आवळा, पेरू व नंतर बोराचा नंबर लागतो. यात कॅल्शियम, फॉस्फरस व लोह हे अधिक प्रमाणात असते. साल, पाने व फळे आणि बिया औषधात वापरतात. साल आमांश व अतिसारावर उपयोगी. पानांचे चूर्ण मधुमेहात उपयोगी असते. पानांचा लेप केसतोडीवर गुणकारी असतो. बोराच्या पानांची चटणी तांदुळाच्या कांजीबरोबर घेतल्यास माणसांचा लठ्ठपणा कमी होतो.
’आघाडा – आघाडा हा स्त्रियांच्या रोगावर विशेष उपयुक्त असतो. श्रावणात जिवतीला यासाठीच पाने वाहतात. पंचांगांचे क्षार विषनाशक आहेत. पावसाळ्यात छातीत साठणाऱ्या कफावर याचे क्षार उपयोगी असतात. काटा टोचला व आतच मोडला तर पाने बारीक करून त्यावर बांधतात. याने वेदना थांबतात व काटा वर निघून येतो. विंचू दंशावर मुळी उगाळून लावतात.
’रुई/मंदार – याचा चीक विषारी असतो. त्वचेला लागल्यास फार दाह होतो व फोड येऊ शकतात. काटा मोडल्यास तळपायाला पानांचा चीक लावल्यास काटा निघतो. मंदारला अर्कपत्र म्हणतात. हे उत्तम कफनाशक, शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांचे कार्य सुधारणे व पर्यायाने शरीराची चयापचय क्रिया सुधारणारी आहे. म्हणूनच शरीर निरोगी करणारे औषध आहे.
’अर्जुन – बलिष्ठ वृक्ष, पाण्याजवळ येतो. यास पांढरा ऐन असेही म्हणतात. हृदयपोषक गुण यामध्ये असतात. हृदयबल देणारे अर्जुनारिष्ट यापासून करतात. नैसर्गिक कॅल्शियम यात मुबलक प्रमाणात असते. अस्थी जोडण्यासाठी त्यास मजबुती येण्यासाठी सालीचे चूर्ण वापरतात. यामुळे हाडे हस्तिदंतासारखी मजबूत होतात.
’मरवा – अतिशय सुगंधी, मनोहारी व वर्षांयू, फूटभर उंचीचे व याचे पंचांग व भस्म औषधात वापरतात. शरीराच्या कार्यामध्ये महत्त्वाची जी काही हार्मोन्स असतात त्या सर्व अंतस्रावी ग्रंथींची राणी समजल्या जाणाऱ्या पीयूषिका ग्रंथीला उत्तेजन देण्याचा नैसर्गिक सुगंध यामध्ये आहे. मारव्यात सुगंध, कोष्टवात प्रशमन, स्वेदजनन, उत्तेजक श्रासार व आर्तवजनन गुण आहेत.
’केवडा – पाने, फुले व मुळांच्या पारंब्या औषधात वापरतात. केवडय़ाच्या फुलांच्या पानात काथ महिनाभर बांधून ठेवतात व नंतर त्याच्या गोळ्या करतात. या गोळ्या तोंडात ठेवल्याने मुखदरुगधी व आंबट पाणी घशाशी येणे कमी होते. केवडय़ामुळे बुद्धी वाढते, पारंब्या बलकारक व देहाला पुष्ठ करणाऱ्या असतात. मूत्रविकारांवर उपयुक्त, फुलांच्या रसामध्ये तयार केलेल्या तुपाच्या सेवनाने मूत्रमार्गाचे रोगनिवारण होते.
अगस्ती – या वनस्पतीचे अनेक उपयोग आहेत. जमीन सुपीक करणे, गुरांचे दूध वाढवणे, मानवाला पोषक आहार देणे. याची पाने, फुले व शेंगा वापरतात. पानांमध्ये गाजराच्या अनेक पट ‘अ’ जीवनसत्त्व बीटा कॅरोटिन असते. याच्या वापराने दृष्टी सुधारते. फुलांमध्ये प्रोटिन्सचे प्रमाण खूप असते. फुलाची भाजी व भजी करतात. शेंगांचीसुद्धा भाजी करतात.
’कण्हेर/करवीर – ही खरे म्हणजे विषारी वनस्पती आहे. हिची विषबाधा झाली तर श्वसनाचा त्रास होतो. तरीसुद्धा अनेक आजारांसाठी हिचा उपयोग होतो. पांढऱ्या व लाल कण्हेरी औषधी आहेत. पांढऱ्या कण्हेरीचे मूळ कानावर बांधले असता तापत्रय म्हणजे वात, कफ, पित्तामुळे होणारा ताप याने बरा होतो. विंचू व सर्पदंशावर पांढऱ्या कण्हेरीचे फुले वाळवून त्याचे नस्य करण्याने विष उतरते. नागिणीवर लाल फुले व तांदूळ रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी वाटून त्याचा लेप लावतात.
’मालती – याचा मुखरोगावर अत्यंत उपयोग होतो.
’डोरली – दशमुळातील पाच लघू वनस्पतीतील एक वनस्पती. रक्तवाहिन्या ज्ञानतंतू, मूत्रपिंड अशा अनेक घटकांवर उपयोगी.
’डाळिंब – पित्तशामक आतडय़ांचे रोग कृमिघ्न असे गुण आहेत. लहान मुलांना होणाऱ्या जंत, जुलाब यांसारख्या आजारात डाळिंब फार उपयुक्त आहे. विशेषत: चपटय़ा कृमी टेपवर्मचा त्रास याने नाहीसा होतो. रक्त शुद्ध होते. ‘क’ जीवनसत्त्व, फळांच्या सेवनाने दूर होतात.
’शंखपुष्पी, विष्णुकांत – गोकर्ण प्रकारातील वनस्पती ज्यांची फुले शंखाच्या आकाराची असतात. बुद्धिवर्धक.
जाई/जलपत्री – बऱ्या न होणाऱ्या व्रणांवर, जखमेवर जाई उपयुक्त आहे. जाईच्या पानांच्या काढय़ाने जखम धुवून त्यावर वाटलेली पाने लावली असता जखम बरी होते, तोंड आलेले बरे होते.

मकरसंक्रांतीपासून (१५ जानेवारी) शहरातील नागरिकांना शेती आणि त्या अनुषंगाने आपल्या भोवती काय काय रुजविता येईल, याचा आढावा घेणारे ‘शहरशेती’ हे सदर चालवण्यात आले. ‘लोकसत्ता ठाणे’च्या माध्यमातून सुरू झालेल्या या लेखमालेला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. सदरातील लेखांविषयी कौतुक करणारे, आणखी प्रश्न विचारणारे अनेक दूरध्वनी, पत्रे मिळाली. आजचा लेख या सदरातील शेवटचा भाग आहे. शहर आणि शेती यांच्यात क्वचितच काही संबंध आढळतो. मात्र, घरातल्या बाल्कनीतील कुंडय़ांपासून आवारातील बगिच्यापर्यंत आपण प्रत्येक जण एका प्रकारे शेती करीत असतो. अशा ‘शेती’मुळे परिसरातील वातावरण चांगले राहतेच पण निसर्गाचीही सेवा होते. त्यामुळेच यापुढेही आपल्यातल्या प्रत्येकाने हिरवाईचा वसा घेऊन शहरात अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संवर्धन केले पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास होईल, अशी कृती टाळणेही विसरू नका!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ganesha patri with medicinal qualities