बदलापूरः बदलापूर गाव, मुरबाड, असंख्य गाव आणि पाड्यांना जोडणारा बदलापूर बारवी धरण रस्त्याच्या खड्डे भरणीबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उदासिनता दाखवल्याने यंदाही गणरायाचे आगमन खड्ड्यातूनच होणार आहे. बदलापूर गावात हजारो मुर्तींची निर्मिती होते. बदलापूर शहर, अंबरनाथ, उल्हासगर आणि आसपासच्या भागातून मुर्ती नेण्यासाठी याच मार्गाने प्रवास करावा लागतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देऊनही खड्डे भरणीच्या कामात दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतो आहे.

बारवी धरणाकडे जाणारा बदलापूर – बारवी धरण रस्ता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत आहे. गेल्या काही वर्षांपासून डांबरी असलेल्या या रस्त्याची दुरावस्था होते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाची प्रतिक्षा आहे. हा रस्ता अंबरनाथ, उल्हासनगरपासून बदलापूर शहर, बदलापूर गाव, अंबरनाथ तालुक्यातील विविध गावे, मुरबाड आणि मुरबाडच्या आसपासच्या गावातील ग्रामस्थांना महत्वाचा आहे. मात्र या रस्त्याच्या कामाकडे कायमच एमआयडीसीने दुर्लक्ष केले आहे.

हेही वाचा >>> ठाण्यातील खड्डे बुजवले नाहीतर गणेशोत्सवनंतर रस्त्यावर उतरू; मनसेचा पालिका नगर अभियंत्यांना इशारा

या रस्त्याला गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. राज्यभरात रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांवरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिथे खड्डा दिसेल तिथे बुजवा असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र एमआयडीसी प्रशासनाने आदेशानंतर एकदाच खड्ड्यांची भरणी करून रस्ते सोडून दिले. त्यानंतर पडलेल्या पावसामुळे पुन्हा खड्डे पडले. मात्र त्या खड्ड्यांकडे एमआयडीसी प्रशासनाने लक्ष्य दिले नाही. बदलापूर शहरातील वालिवली, एरजांड भागातून जाणाऱ्या या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. वालिवली चौकात रस्त्याची भीषण अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या एमआयडीसीचे अधिकारी रोज याच रस्त्याने बारवी धरणापर्यंतचा प्रवास करतात. त्यांनंतरही खड्डे बुडजवले जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतो आहे. याबाबत एका कनिष्ट अधिकाऱ्याशी संपर्क केला असता, एकदा खड्डे बुजवले आहेत, अशी बेफिकीर प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा >>> खड्ड्याने घेतला आणखी जीव, डोंबिवली जवळील आगासन गावात खड्डा चुकविताना तरुणाचा मृत्यू, मनसे आमदार प्रमोद पाटील यांची सरकारवर टीका

गणरायाचे आगमन खड्ड्यातूनच

बदलापूर गावात हजारो गणेश मुर्ती तयार केल्या जातात. त्या अंबरनाथ, बदलापूर शहर या भागात नेल्या जातात. त्यांच्यासाठी हा रस्ता महत्वाचा आहे. शहरातील वाहतूक कोंडी टाळून शहराबाहेर जाण्यासाठीही याच रस्त्याचा वापर केला जातो. या रस्त्यावर उल्हास नदीकिनारी आणि शिवमंदिर तलाव येथे विसर्जन घाटही आहे. त्यामुळे येथे मोठी गर्दी असते. खड्ड्यांमुळे यात भर पडणार आहे.

प्रतिक्रियाः या रस्त्याचे पावसाळ्यानंतर डांबरीकरण केले जाणार आहे. तत्पूर्वी तातडीने या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात येणार असून तसे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सुधीर नागे, अधिक्षक अभियंता, एमआयडीसी.