गणेशोत्सव सजावटीचे साहित्य महागले

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असल्यामुळे या वस्तूंच्या दरातही वाढ झाली असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.

पूर्वा साडविलकर/ निखील अहिरे, लोकसत्ता

ठाणे : मागील वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या बाजारपेठेवर करोनाचे सावट असले तरी उत्सवासाठी लागणारे सजावट साहित्याच्या दरात मात्र वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चिनी बनावटीच्या रोषणाई माळा, कृत्रीम फुलांचे सजावट साहित्याला दरवर्षी बाजारात मोठी मागणी असते. यंदा चीनहून केवळ ५ ते १० टक्केच माल मुंबई, ठाण्याच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. यामुळे बाजारात मोठय़ा प्रमाणात भारतीय बनावटीचा माल विक्रीसाठी दाखल झाला असून मागणी-पुरवठय़ात तफावत दिसू लागल्याने दरातही वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असल्यामुळे या वस्तूंच्या दरातही वाढ झाली असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे तसेच उपनगरांतील बाजारपेठा सजल्या असून ग्राहकांची खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. गेल्या वर्षी करोना प्रादुर्भावामुळे सजावटीचे साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला होता. यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून राज्य शासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. त्यामुळे बाजारपेठा रात्री १० वाजेपर्यंत खुल्या ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. मुंबई, ठाणे तसेच उपनगरांतील बाजारपेठा गणेशोत्सवानिमित्त सजल्या असून आकर्षित रोषणाई, कृत्रीम फुलांच्या माला बाजारात दिसत आहेत. यंदा भारतीय बनावटीचे साहित्य मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाले असून त्यासह चीनहून केवळ पाच ते दहा टक्केच सजावटीचे साहित्य दाखल झाले आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असल्यामुळे या वस्तूंच्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाली असून गेल्यावर्षी ७० ते ८० रुपयांना विक्री करण्यात येणाऱ्या फुलांचे गुच्छ यंदा ८५ ते ९० रुपयांनी विकण्यात येत आहेत, तर ४० रुपये ते १२० रुपयांना विकली जाणारी फुलांची माळ यंदा ५० ते १५० रुपयांना विक्री केली जात आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ganeshotsav decoration materials become costly ahead of festival zws

ताज्या बातम्या