ठाणे : गणेशोत्सवानिमित्ताने मुंबई महानगरातून हजारो नागरिक खासगी वाहने, एसटी बसगाड्यांनी कोकण किंवा त्यांच्या गावी जातात. या कालावाधीत वाहनांचा भार वाढून महामुंबईतील विविध महामार्ग आणि प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून लवकरच अवजड वाहतूक संदर्भात निर्बंध लागू केले जाणार आहे. अवजड वाहनांना बंदी लागू केल्यास महामुंबईतील लाखो नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरातील मुंबई-नाशिक महामार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग, शीळफाटा, घोडबंदर मार्ग, मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि मुंब्रा बाह्यवळण मार्ग हे प्रमुख वाहतूक मार्ग आहेत. या मार्गांवरून दररोज लाखो वाहनांची वाहतूक होते. त्यातच उरण येथील जेएनपीए बंदरातून निघणारी तसेच भिवंडी, वसई-विरार, पालघर आणि गुजरातच्या दिशेने जाणारी जड-अवजड वाहनेही याच मार्गांचा वापर करतात. गणेशोत्सवाच्या काळात खासगी वाहनांची संख्या वाढल्याने या मार्गांवरील वाहतुकीवर अतिरिक्त ताण येतो.
यंदा गणेशोत्सवासाठी सुमारे २,९०० मोफत एसटी बसगाड्या कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोडण्यात आल्या आहेत. तसेच, अनेकजण खासगी वाहनानेही गावी जातील. त्यामुळे प्रमुख महामार्गांसह अंतर्गत मार्गांवरही वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी महामुंबईतील विविध भागांत अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध लागू केले जाणार आहेत. नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर आणि भिवंडी या भागांतही निर्बंध लागू होणार असल्याने गणेशभक्तांसह नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केली जाणार आहे. याबाबतची अधिकृत अधिसूचना येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी परिवहन विभागानेही १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या या काळात मोठ्या प्रमाणात वाढते. एसटी महामंडळाच्या जादा बसगाड्यांसह खासगी वाहनांचीही मोठी वर्दळ असते. त्यात अवजड वाहने, ट्रेलर तसेच रेती-वाळू वाहून नेणारी वाहने रस्त्यावर आल्यास कोंडीची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या विविध टप्प्यांत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्बंधातून अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे. तसेच स्थानिक परिस्थितीनुसार गरज भासल्यास निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच संबंधित जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत असे परिवहन विभागाने स्पष्ट केले.
