Konkan Ganeshotsav Traffic Advisory: गणेशोत्सवानिमित्ताने ठाणे, मुंबईसह विविध भागात नागरिक एसटी बसगाड्यांतून कोकणात जात असतात. परंतु रायगड पोलिसांनी महत्त्वाचे वाहतूक बदल लागू केले असून अनेक महत्त्वाचे पर्यायी मार्ग पोलिसांनी सूचविले आहेत. त्यामुळे माणगावातील नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील हजारो नागरिक कोकणात रस्ते मार्गाने प्रवास करतात. या कालावधीत मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. सर्वाधिक वाहतूक कोंडीचे केंद्र माणगाव हा परिसर आहे. अत्यंत अरुंद रस्त्यामुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगड पोलिसांनी काही महत्त्वाचे वाहतूक बदल माणगाव भागात लागू केले आहेत. या वाहतूक बदलानुसार, महाड, मुंबई येथून येणाऱ्या बसगाड्या जुन्या माणगाव बसथांब्यात जाणार नाही. या बसगाड्या रस्त्याजवळील बसथांब्यावर प्रवाशांना उतरवून बसगाडी पुढे वाहतूक करेल. त्यामुळे बसथांब्यातून बाहेर पडणाऱ्या गाड्या वाहतूक कोंडीत अडकणार नाही.
निजामपूर रोड येथे काही प्रमाणात बायपास झाला आहे. त्यामुळे पुणे आणि पाली मार्गे वाहतूक करणारी वाहनांना या मार्गाचा वापर करता येणार आहे. येथून तळ-कोकण, महाडच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने बायपास मार्गे वळविण्यात येतील. श्रीवर्धन आणि म्हसळ्याला जाणारी वाहने गोरेगाव मार्गे वाहतूक करतील. मुंबईहून येणाऱ्या खासगी वाहनांना तीन मार्गांचा पर्याय उपलब्ध असेल. यामध्ये इंदापूर-तळा मार्गे किंवा खरवली फाटा किंवा एमआरएफ बसथांबा एकमार्गिका उपजिल्हा रुग्णालय मार्गे मोरबा रोड येथून वाहतूक करतील.
