गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीचे शुल्क माफ

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत ३००हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत.

‘एक खिडकी’ योजनेतून परवानग्या देण्याची कल्याण-डोंबिवलीत व्यवस्था

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा करोना महासाथीने निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून मंडप परवानगीसाठी शुल्क माफ करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे. मंडळांना ‘एक खिडकी योजने’तून मंडप परवानग्या देण्यात येणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ५ सप्टेंबपर्यंत आपल्या हद्दीतील प्रभाग क्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत ३००हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या मंडळांना पालिकेकडून मंडप उभारणीसाठी परवानगी दिली जाते. मंडळाच्या कार्यकर्त्यांना एकाच ठिकाणी परवानगी मिळावी यासाठी पालिकेने प्रभाग क्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये एक खिडकी योजनेतून या परवानग्या देण्याची व्यवस्था केली आहे. मंडप उभारणीसाठी पालिकेकडून चौरस फुटाप्रमाणे मंडळाकडून दर आकारला जातो. याशिवाय अग्निशमन विभागाची परवानगी घेताना शुल्क आकारणी केली जाते. हे दोन्ही ठिकाणचे शुल्क आकारायचे नाही, असा निर्णय आयुक्त सूर्यवंशी यांनी घेतला आहे.  सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारणीसाठी मंडळांना वाहतूक विभाग, महावितरण, अग्निशमन विभाग, स्थानिक पोलीस ठाण्यातून ना हरकत दाखले मिळविणे आवश्यक आहे. मंडप परवानगीसाठी गणेशोत्सव मंडळांनी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्थानिक पालिका प्रभाग क्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. अनेक गृहनिर्माण सोसायटय़ा आवारात गणेशोत्सव साजरा करतात. या सोसायटी पदाधिकाऱ्यांनी अग्निशमन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

गणेशोत्सव मंडळांनी १० दिवस उत्सव साजरा करताना घ्यावयाची काळजी याविषयी आयुक्त सूर्यवंशी यांनी दूरदृश्य प्रणालीतून शहरातील गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ९२ मंडळांचे कार्यकर्ते या बैठकीत सहभागी झाले. सार्वजनिक ठिकाणच्या रस्ते, गल्लीबोळात, मैदानात गणेशोत्सवाचा मंडप उभारणी करताना मंडपाचा आकार सहा बाय आठ फूट असावा. या नियमाचे कोणीही उल्लंघन करू नये. वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने मंडप उभारणी करू नये, अशा सूचना आयुक्तांनी कार्यकर्त्यांना केल्या. करोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून कार्यकर्त्यांनी उत्सव साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पालिकेची व्यवस्था

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत टिटवाळा, कल्याण, डोंबिवली परिसरांतील ६८ ठिकाणी पालिकेने गणपती विसर्जनाची सुविधा केली आहे. विसर्जन मार्ग आणि गणेश घाटांवर १५२ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. प्रखर झोताचे दोन हजार ४४७ दिवे विसर्जनस्थळी बसविण्यात आले आहेत. विद्युतपुरवठा खंडित झाला तर अत्यावश्यक प्रसंगासाठी ६६ जनरेटर सज्ज ठेवण्यात आली आहेत. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांना घराजवळ विसर्जन करता यावे, यासाठी ‘विसर्जन आपल्या दारी उपक्रम’ पालिकेतर्फे राबविण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागांत कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहेत. .

पाहणीसाठी पथके

मंडप उभारणी, तेथील स्वच्छता यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पथके तयार केली जाणार आहेत. ही पथके नियमित प्रभाग हद्दीतील गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन तेथे करोना प्रतिबंध नियमांचे पालन केले जाते की नाही याची पाहणी करतील. जेथे नियमांचे उल्लंघन होत असेल तेथे प्रथम समज देण्यात येईल. तेथे वारंवार नियमांचे उल्लंघन होत असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ganeshotsav mandals exempted mandap erection charges ssh