ठाणे- गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलावावर दीपोत्सव साजरा केला जातो. या दीपोत्सवाचे एक वेगळेच आकर्षण असते. परंतू, यंदा या दीपोत्सवासह तलावाच्या काठावर गंगा आरती केली जाणार आहे. या आरतीसाठी खास वाराणसीहून पंडीत येणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांना गंगा आरती अनुभवण्याची एक वेगळीच पर्वणी मिळणार आहे.
श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या माध्यमातून गेले २४ वर्ष गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त शहरात स्वागत यात्रेचे आयोजन केले जाते. यंदा या स्वागत यात्रेचे २५ वे वर्ष आहे. त्यामुळे यंदाची स्वागत यात्रा भव्य स्वरुपात करण्याचा न्यासाचा प्रयत्न आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलावावर दीपोत्सव आणि तलावाच्या काठावर आरती करण्याची परंपरा आहे. या स्वागता यात्रा निमित्त मासुंदा तलावाच्या भोवताली आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात येते. त्यात, पूर्वसंध्येला करण्यात येणाऱ्या दीपोत्सवामुळे मासुंदा तलाव आणखी आकर्षक दिसत असतो. हे पाहण्यासाठी शहरातील विविध भागातून नागरिक येत असतात. यंदा २५ वे वर्ष असल्यामुळे दीपोत्सवासह गंगा आरतीचे ही आयोजन करण्यात आले आहे. यासाठी खास वाराणसी येथील पंडीतांना निमंत्रित केले आहे. या पंडितांकडून गंगा आरती केली जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना हरिद्वारची अनुभूती देणारी गंगा आरती पाहण्यास मिळणार आहे. ही गंगा आरती २८ मार्च रोजी उपवन येथे तर, २९ मार्च रोजी मासुंदा तलावाजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाट येथे होणार आहे.
महापालिकेत स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न
श्रीकौपिनेश्वर मंदिरापासून स्वागत यात्रेस सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व रस्त्यांची साफसफाई, मंदिरा शेजारी असलेल्या भाजी बाजारपेठ परिसरात स्वच्छता ठेवणे, तलावपाळीचा संपूर्ण परिसराची स्वच्छता करणे, स्वागत यात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार तसेच यात्रे दरम्यान रुग्ण्वाहिका उपलब्ध करणे. तर, गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव परिसर स्वच्छ करुन घेण्याबाबतच्या सूचनाही अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी बैठकीत दिल्या आहेत.
यंदा स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी
श्रीकौपिनेश्वर मंदिर येथून सुरू होणारी स्वागतयात्रा चिंतामणी चौक येथून दगडी शाळा – गजानन महाराज मठ- तीन पेट्रोलपंप मार्गे हरिनिवास सर्कल – गोखले रोड, राममारुती रोड मार्गे जाणार आहे. जांभळीनाका, हरिनिवास सर्कल आणि समर्थ भांडार गोखले रोड या ठिकाणी यात्रेवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी स्वागतयात्रा संबंधित महापालिकेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दिली.