संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांची अपेक्षा; मुलाखतीतून संघर्षमय जीवनपट उलगडला
सध्याच्या महागाईच्या काळात नाटय़ संमेलनासाठी शासनाकडून मिळणारे २५ लाख रुपयांचे अनुदान अतिशय अपुरे आहे. ठाणेकरांनी मदत केली नसती तर संमेलनाचा हा खर्च परिषदेला पेलवला नसता. त्यामुळे पुढील काळात शासनाने नाटय़ संमेलनासाठी ५० लाख रुपये अनुदान द्यावे, अशी अपेक्षा नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केली.
गंगाराम गवाणकर लिखित ‘चित्रानंद’ या नव्या नाटकाचा प्रयोग संमेलनात झाला. त्यापूर्वी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे कार्यवाह दीपक करंजीकर यांनी गवाणकर यांच्याशी संवाद साधला.
मुलाखतीदरम्यान गंगाराम गवाणकर यांनी आपल्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. एस.टी.च्या लाल डब्यातून कोकणातून आलेले गवाणकर उमेदवारीच्या काळात दिव्यात राहत होते. ‘दिव्यातील अंधारात लिहिलेल्या नाटकांनीच मला प्रकाशात आणून नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपद मिळवून दिले,’ असे त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.
गाव सोडून शहरात आल्यानंतर येथे करावे लागलेले कष्ट, लिखाणाचे वेड, त्यातून झालेला रंगभूमीचा परिचय आदी प्रवास गवाणकर यांनी उलगडून दाखविला. नाटय़ संमेलनाध्यक्षपदाचा कालावधी दोन वर्षांचा हवा हा फैयाज यांच्या मागणीला त्यांनी दुजोरा दिला.
बोलीभाषेच्या वैशिष्टय़ांऐवजी सवंग विनोदाचेच दर्शन
‘गर्दीपेक्षा दर्दीला सलाम करतो’, असे म्हणत आमची बोली आमची बाणा या नाटय़संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या कार्यक्रमात विदर्भातून आलेल्या अनंत खेळकर यांनी आपल्या वऱ्हाडी बोलीभाषेतून रसिकांना खिळवून ठेवले होते.
मात्र महाराष्ट्रातील विविध बोलीभाषा सादर करणाऱ्या इतर कलाकारांनी रिअॅलिटी शोमध्ये चालणारे विनोद सादर केल्याने नाटय़ संमेलनात सादर होणाऱ्या कार्यक्रमाचा दर्जा काहीसा सवंग मनोरंजनाकडे झुकला.
नाटय़ संमेलनाच्या दादोजी कोंडदेव स्टेडिअममधील नटवर्य मामा पेंडसे या मुख्य मंडपात शनिवारी सकाळी पार पडलेल्या ‘आपली बोली आपला बाणा’ या कार्यक्रमात बोलीभाषांची रंगत ऐकायला मिळण्याच्या अपेक्षेने आलेल्या रसिकांची मात्र त्यामुळे साफ निराशा झाली.
या कार्यक्रमाच्या नावाप्रमाणे वेगवेगळ्या भाषांमधील गंमत ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र टी.व्ही.वरील विनोदी बाजाची स्टँडअप कॉमेडीच बहुतेकांनी सादर केली. त्या त्या भाषांचा बाज, लहेजा आदी गोष्टींचे दर्शन घडलेच नाही.
अनंत खेळकर यांनी कार्यक्रमाची रंगतदार सुरुवात केली. त्यांनी आपल्या भाषेत जुगाड म्हणजे काय, जुगाड या शब्दाची टेक्नॉलॉजी दाखवून दिली.
वऱ्हाडी, पुणेरी, आगरी, कोळी, मालवणी आदी अनेक बोलीभाषांमधील विनोदी प्रहसने सुप्रिया पाठारे, अतुल तोडणकर, आशुतोष वाडेकर, नयन जाधव, विकास समुद्रे, राहुल बेलापूरकर, सुदेश वशेकर, प्रशांत जाधव यांनी आपली कला या वेळी येथे सादर केली.



