उसने पैसे देण्याच्या बहाण्याने महिलेला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दोघेही पीडितेच्या पतीचे मित्र आहेत. कल्याणमधील द्वारली पाड्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. दोघेही संशयित आरोपी बेस्टचे चालक असून उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी सुनील मोरे आणि अरविंद कुंभार यांना अटक केली आहे. हे दोघेही पीडित महिलेच्या पतीचे मित्र आहेत. तिच्या पतीने सुनील मोरे याच्याकडे १० हजार रुपये उसने मागितले होते. हे पैसे देण्याच्या बहाण्याने या दोघांनी पीडितेला बुधवारी द्वारली पाड्यातील घरी बोलावले होते. तिथे मोरे याच्यासह अरविंद कुंभार यांने तिच्यावर बलात्कार केला. त्याचे चित्रणही त्यांनी मोबाईलमध्ये केले. पीडितेने शुक्रवारी अरविंद कुंभार याचा मोबाईल मिळवला. त्यानंतर थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून हिललाईन पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.



