ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभी राहत असून ती उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना कुख्यात गुंड रवी पुजारीकडून खंडणीसाठी धमक्या वाढू लागल्याने खडबडून जागे झालेल्या ठाणे पोलिसांनी आता पुजारी टोळीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पुजारीचा ठावठिकाणा शोधण्याकरिता ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने त्याच्या दोन बहिणींना खास दिल्लीहून ठाण्यात बोलावून घेतल्याचे विश्वसनीय वृत्त असून या दोघींची गुरुवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आल्याचे बोलले जाते. बिल्डर, राजकीय नेत्यांना धमकाविणाऱ्या पुजारीच्या कारवायांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांनाच चौकशीच्या फेऱ्यात अडकविण्याची खेळी खेळली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ठाणे, कल्याण तसेच उल्हासनगर भागातील लोकप्रतिनिधी, बांधकाम व्यवसायिक आणि व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकीचे दूरध्वनी येऊ लागले असून, कुख्यात डॉन रवी पुजारीच्या नावाने या धमक्या देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत तीन ते चार तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींच्या आधारे ठाणे खंडणी विरोधी पथकाने आतापर्यंत रवी पुजारीच्या सहा हस्तकांना अटक केली आहे, मात्र या हस्तकांकडून खंडणी विरोधी पथकाला रवी पुजारीच्या ठावठिकाण्याविषयी ठोस माहिती मिळू शकलेली नाही. अखेर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आदेशानुसार खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी दिल्लीत राहणाऱ्या रवी पुजारीच्या दोन बहिणींना ठाण्यात चौकशीसाठी आणले.
विजयालक्ष्मी आणि नयना या दोघी दिल्लीतून ठाण्यात आल्यानंतर दिवसभर दोघींची चौकशी करण्यात आली. रवी पुजारीचा पूर्वइतिहास, त्याचे सध्याचे वास्तव्य, तो भारतात की परदेशात आहे आणि तो सध्या कुटुंबाच्या संपर्कात आहे का, याविषयी दोघींकडे पथकाने कसून चौकशी केली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पोलीस आक्रमक
ठाणे शहरापाठोपाठ कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये मोठ-मोठय़ा बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प सुरू आहेत, मात्र गेल्या काही महिन्यांपासून रवी पुजारीच्या नावाने खंडणीसाठी धमक्यांचे दूरध्वनी येऊ लागल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याशिवाय, पुजारीकडून लोकप्रतिनिधींनाही धमक्या येऊ लागल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी रवी पुजारीच्या काही हस्तकांना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. या अटकेनंतर खंडणीकरिता येणारे धमकीचे दूरध्वनी कमी झाले होते. असे असताना काही महिन्यांपासून रवी पुजारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी त्याच्याभोवतीचा फास अधिकाधिक घट्ट करण्यासाठी पावले उचचल्याचे अलिकडील कारवायांवरून स्पष्ट होत आहे.

आता रवी पुजारी रडारवर
ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि मुंबई शहरात खंडणीसाठी कुख्यात गुंड सुरेश मंचेकर आणि त्याच्या टोळीने धुडगूस घातला होता. त्यामुळे निवृत्त पोलीस अधिकारी व चकमकफेम रवींद्र आंग्रे यांच्या रडारावर मंचेकर आणि त्याची टोळी आली होती आणि त्यातूनच १२ वर्षांपूर्वी आंग्रे यांनी सुरेश मंचेकर आणि त्याची टोळी संपवली होती. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या रडारावर रवी पुजारी आणि त्याची टोळी ठाण्यात असल्याची चर्चा असून आयुक्त सिंग यांनी त्याचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.