लोकसत्ता खास प्रतिनिधी कल्याण: कल्याण परिसरात दहशत निर्माण करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा आणि विविध पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल असलेला खतरनाक गुंड साजीद उर्फ शानू मोहमद अकील शेख (२५, रा. बेतुरकरपाडा, भिकू भय्या चाळ) याला महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक करुन त्याला पुणे येथील येरवडा तुरुंगात एक वर्षासाठी स्थानबध्द केले. कल्याण शहर परिसरातील वाढती गुन्हेगारी, हत्येच्या लगोपाठ घडलेल्या घटनांमुळे पोलिसांनी हे आक्रमक पाऊल उचलले आहे. साजीद विरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात बेकायदा जमाव जमवणे, गंभीर दुखापती करणे, शस्त्र जवळ बाळगणे, दहशत निर्माण करुन दमदाटी करण्याचे गुन्हे दाखल होते. हेही वाचा. “…तरी फडणवीसांना वेदना होत नसतील तर दुर्दैवी”, संजय राऊतांचं टीकास्र; ‘त्या’ प्रकरणाचा केला उल्लेख! पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी साजीदचा खतरनाक गु्न्हेगार असल्याचा आणि त्याच्यावर गुन्हेगार प्रतिबंधकात्मक कारवाई आवश्यक असल्याचा अहवाल पोलीस आयुक्तांना पाठविला होता. आयुक्तांनी या आदेशावर शिक्कामोर्तब करताच महात्मा फुले पोलिसांनी एक वर्षासाठी साजीदला स्थानबध्द करुन त्याची रवानगी येरवाडा कारागृहात केली. यादी तयार महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीत पाच हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या खतरनाक गुंडांची यादी पोलिसांनी तयारी केली आहे. या सर्व गुंडांवर टप्प्याने स्थानबध्द आणि तडीपारीची कारवाई केली जाणार आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. कल्याण पूर्वेतील वाढती गुन्हेगारी विचारात घेऊन या भागातील खतरनाक गुन्हेगारांची यादी कोळसेवाडी पोलिसांनी करण्यास सुरुवात केली आहे. कल्याण पूर्व भागात सर्वाधिक खतरनाक गुंड राहत असल्याची पोलिसांची माहिती आहे. काही जण राजकीय आधार घेऊन आपल्या कारवाया करत असतात.