ठाण्यात शासकीय नियमांकडे दुर्लक्ष; करोना संसर्ग वाढण्याची भीती

ठाणे : नवरात्रोत्सवामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या गरब्यामुळे नागरिकांची गर्दी होऊन करोनाचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनासह महापालिकांनी यंदा गरब्याला बंदी घातली आहे. असे असले तरी काही नागरिकांनी आता त्यावर नवी शक्कल लढवत इमारतींच्या गच्चीवर गरबा खेळण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये हे चित्र दिसून येत आहे. तर काही ठिकाणी चाळींमध्ये गरबा खेळला जात आहे. या प्रकारामुळे करोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठाणे जिल्ह्य़ात दरवर्षी नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. या उत्सवामध्ये गरब्याचे आयोजन करण्यात येते. त्यानिमित्ताने नागरिक मोठय़ा संख्येने एकत्र येतात. मात्र, यंदा नवरात्रोत्सवावर करोनाचे सावट आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाने गरब्याला बंदी घातली आहे. तसेच नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मंडळांना केले आहे. यामुळेच अनेक मंडळांनी उत्सवातून माघार घेतल्याचे चित्र आहे. यंदा गरबा खेळण्यावर मर्यादा आल्यामुळे अनेकांचा हिरमोड

झाला आहे. असे असले तरी काही जणांनी त्यावर नवी शक्कल लढविली असून त्यानुसार जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागांत छुप्या पद्धतीने गरबा होत असल्याचे चित्र दिसून येते. ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांतील नागरिक इमारतींच्या गच्चीवर आणि बैठय़ा चाळींमध्ये गरब्याचे आयोजन करू लागले आहेत. हा गरबा खेळण्यासाठी ५० हून अधिक नागरिक एकत्र येत असून सायंकाळी ७.३० वाजेपासून हा गरब्याचा कार्यक्रम रंगत आहे. यासाठी इमारतीमध्ये ध्वनीक्षेपकही लावला जात आहे. संगीताच्या ठेक्यावर गरबा खेळला जात आहे.

काही ठिकाणी चाळींमध्येही गरबा खेळळा जात आहे. मुखपट्टीविना आणि अंतरसोवळ्याच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. अशा प्रकारे गरबा आयोजनाचे प्रमाण कमी असले तरी अशा गरबा आयोजनामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे याकडे पालिका आणि पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी दक्ष नागरिकांकडून होत आहे.

शासनाच्या नियमानुसार इमारतीच्या गच्चीवर गरबा खेळण्यास बंदी आहे. त्यामुळे आमच्याकडूनही गच्चीवर गरबा खेळण्यास कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. नागरिकांनी नियमांचे पालन करावे.

– डॉ. सुरेशकुमार मेकला, सहआयुक्त, ठाणे पोलीस.