वेळ बदलली अन् कोंडी सुटली!

कचरा वाहनांची वेळ बदलल्यामुळे केळकर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

केळकर रस्त्यावरील कचरा सफाई
डोंबिवली पूर्व भागातील केळकर रस्त्यावर इंदिरा चौकाच्या कोपऱ्यावर टाकण्यात येणारा कचरा शुक्रवारी सकाळी आठ वाजताच पालिका कर्मचाऱ्यांनी उचलल्याने या भागातील वाहतूक कोंडी पूर्णपणे सुटली. नोकरदार वर्गाची कामाला जाण्याची घाई आणि त्याचवेळी महापालिकेचे कचरावाहू वाहन केळकर रस्त्यावर येऊन कचरा उचलत असल्याने केळकर रस्त्यावर नियमित सकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी होत होती.
केळकर रस्त्यावरील कचरा उचलण्याचे काम सकाळी ८.३० ते ९ या वेळेत होत असे. याच वेळेत नोकरदार वर्गाची कामावर जाण्याची घाई असते. केळकर रस्त्यावर एकेरी वाहतूक होत असते. त्यातच तो अरुंद, त्यात दोन रांगांमध्ये रिक्षा वाहनतळ, त्यात कचरा गाडय़ा कचरा उचलण्यासाठी आल्या की त्या अर्धा तास येथे थांबत असत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे. या कोंडीमुळे रिक्षाचालक प्रवाशांना भर रस्त्यातच प्रवाशांना उतरवत असत. या कचरा गाडय़ांची वेळ बदलली तर ही कोंडी कमी होऊ शकते असा विचार पुढे आल्यानंतर ती वेळ सकाळी आठ वाजण्याची करावी अशी मागणी या भागातील रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी लावून धरली होती. ‘लोकसत्ता ठाणे’ने याबाबतचे वृत्त गुरुवारी प्रकाशित करताच, शुक्रवारी सकाळी आठ वाजण्यापूर्वीच केळकर रस्त्याच्या कोपऱ्यावरील कचरा पालिका कर्मचाऱ्यांनी उचलल्याचे पाहण्यास मिळाले. कचरा वाहनांची वेळ बदलल्यामुळे केळकर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Garbage cleaning from kelkar road