निवडणूक काळात पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

शहरात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता राखा असा संदेश देत कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने स्वच्छतेचा केवळ दिंडोरा पिटला आहे. महापालिकेचे आयुक्त रवींद्रन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगोलाग शहरात स्वच्छता राखली जाईल यासाठी सर्वत्र लक्ष देण्यास सुरुवात केली. परंतु निवडणुकीच्या काळात महापालिका प्रशासनाने या स्वच्छतेकडे पुरते दुर्लक्ष केले असून त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग साठण्यास सुरुवात झाली आहे. डोंबिवलीतील एस. के. पाटील शाळेसमोरील कचऱ्याचे ढीग हलविण्यासंदर्भात शाळेने वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शाळेने केला आहे.
डोंबिवली पूर्वेतील टंडन रस्त्यावरून एस. के. पाटील शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ जाणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचे मोठमोठे ढीग पडलेले पाहायला मिळत आहेत. शाळेच्या समोरच झोपडपट्टी वस्ती असून येथे कचरावेचक महिला राहतात. या महिला रस्त्यावरच कचरावेचकाचे काम करतात. तसेच या वस्तीतील नागरिक प्रातर्विधीसाठी सकाळी या रस्त्याचाच वापर करतात. कचऱ्यासोबतच काचेच्या बाटल्याही वाहनांच्या चाकाखाली आल्याने त्या फुटून त्यांचे तुकडे रस्त्यावर विखुरलेले असतात. येथील महिलांना वारंवार सूचना करूनही हा कचरा इथेच केला जातो. गणपती व नवरात्रीत जमा झालेला कचरा सध्या या रस्त्यावर जमा झाला असून येथून चालणेही कठीण होते. शाळेतील लहान मुलांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी याच रस्त्यातून शाळेच्या दिशेने जातात. त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. शाळेच्या गेटसमोरील बाकडय़ांवर सायंकाळी बाहेरील मुले सिगारेट ओढत बसलेली असतात, काही जण मद्यपानही करतात. या मुलांचा बंदोबस्त करणे तसेच येथील कचऱ्याचा ढीग हटविण्यासंदर्भात पालिका अधिकारी आयुक्त यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणी त्याकडे लक्ष देत नाही असा आरोप शाळेच्या मुख्याध्यापिका लता शिंदे यांनी केला आहे.