scorecardresearch

‘ती’ वायुगळती बदलापूरच्या औद्योगिक वसाहतीतूनच

सलग दोन दिवसांच्या वायुगळतीनंतर अखेर कंपनीचा शोध

‘ती’ वायुगळती बदलापूरच्या औद्योगिक वसाहतीतूनच
प्रतिनिधिक छायाचित्र

सलग दोन दिवसांच्या वायुगळतीनंतर अखेर कंपनीचा शोध

बदलापूर : बदलापूर शहरात रविवार आणि मंगळवार अशा दोन दिवस रात्रीच्या सुमारास वायुगळती झाल्याने शहरभर उग्र दर्प पसरला होता. पहिल्या दिवशी वायुगळती झालेल्या कंपनीचा शोध घेण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी अखेर या कंपनीचा शोध घेतला आहे. ‘एस्केल केमिकल्स’ असे या कंपनीचे नाव असून या कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीत काम सुरू असताना तापमान वाढल्याने हा वायू बाहेर पडल्याने शहरभर दर्प पसरल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अंबरनाथ शहरात सातत्याने पसरणाऱ्या उग्र रासायनिक दर्पाच्या घटना ताज्या असतानाच आता बदलापूर शहरातही रासायनिक दर्पाने बदलापूरकरांची झोप उडवली आहे. रविवार २६ सप्टेंबर रोजी पहिल्यांदा रात्री ९ ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत शहरभर रासायनिक वायूचा उग्र दर्प पसरला होता. जून महिन्यात एका कंपनीतून वायुगळती झाल्याची घटना समोर असल्याने नागरिकांत उग्र दर्पाने भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिक अग्निशमन दल आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रारी करत होते. मात्र त्यांच्या पाहणीत रात्री उशिरापर्यंत काहीही आढळले नव्हते. त्यामुळे शहरातील नैसर्गिक नाल्यांमध्ये रासायनिक सांडपाण्याचे टँकर तर रिते केले नाहीत ना, असा संशय बळावला होता. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पुन्हा तोच रासायनिक दर्प शहरभर पसरला. रविवारपेक्षा मंगळवारी पसरलेला दर्प अधिक तीव्र होता. बदलापूर शहरात सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस पडत असतानाच पसरलेल्या या दर्पामुळे एकच खळबळ उडाली. पाऊस पडत असल्याने वायू अधिक काळ टिकतो की काय या भीतीने बदलापूरकर अधिकच अस्वस्थ झाले होते. अनेक ठिकाणी दारे खिडक्या बंद करूनही दर्पाची तीव्रता जाणवत होती.

विशेष म्हणजे बदलापूरच्या पश्चिमेचे टोक असलेल्या बेलवली हेंद्रेपाडा या भागातही हा दर्प तितक्याच तीव्रतेने जाणवला. याबाबत तक्रारी आल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण प्रादेशिक कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत बदलापुरात पाहणी करत होते. या वेळी बदलापूर पूर्वेतील औद्योगिक वसाहतीतूनच हा वायुगळती झाल्याचे समोर आले.

कंपनीवर गुन्हा दाखल नाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘एस्केल केमिकल्स’ असे या कंपनीचे नाव असून या ठिकाणी तापमान वाढल्याने वायू पसरल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या कंपनीला आता कामकाज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या कंपनीवर अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली नाही. त्यामुळे कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे दोन दिवस नागरिकांना त्रास सहन करावा लागला असला तरी या कंपन्यांवर ठोस काही कारवाई होईल का हा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gas leak in badlapur from scale chemical company zws

ताज्या बातम्या