ठाणे – इराण-इस्त्रायल संघर्षाच्या परिस्थितीमुळे मागील काही दिवसांपासून गॅसच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाला आहे. गॅसच्या वाढत्या दरांबरोबरच पुरवठा कमी झाल्यामुळे शहरातील छोट्या खानावळी आणि हॉटेल व्यवसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कोपरी पूर्व येथील तब्बल १५ वर्षांपासून खवय्यांची भूक भागवणाऱ्या ‘पाटील पोळी भाजी केंद्रा’वर आता चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. गॅस मिळत नसल्याने लाकडे गोळा करून जेवणाची तयारी करण्याची वेळ मालकांवर आली असून विद्यार्थ्यांसह बॅचलर तरुणांचे पोट भरण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

इराण-इस्त्रायल संघर्षामुळे खनिज तेल, एलपीजी आणि सीएनजीच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्याच्या झळा आता भारतातील विविध क्षेत्रांनाही बसू लागल्या आहेत. ठाणे शहरातील हॉटेल आणि खानावळ व्यवसायावरही या परिस्थितीचा परिणाम जाणवू लागला असून गॅस अभावी काही ठिकाणी व्यवसाय ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गॅसच्या वाढत्या किंमती आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे खानावळ चालवणे कठीण झाले असल्याचे ‘पाटील पोळी भाजी केंद्रा’चे मालक अजित पाटील यांनी सांगितले.

सध्या एका गॅस सिलिंडरसाठी तब्बल चार हजार रुपये सांगितले जात आहेत, तरीही सिलिंडर मिळत नाही. आमच्या खानावळीत दररोज ३५ ते ४० प्रकारचे पदार्थ तयार केले जात होते. मात्र गॅसचा तुटवडा सुरू झाल्यापासून केवळ चार-पाच पदार्थांवर मर्यादा आणावी लागली आहे. आज दुपारपर्यंत आमच्याकडील गॅस संपणार आहे. त्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी चुलीवर स्वयंपाक करण्याची तयारी केली आहे. डाळ-भात असे साधे पदार्थ तरी तयार करता येतील, असे पाटील यांनी सांगितले.

गॅस उपलब्ध नसल्याने त्यांनी लाकडे गोळा करून ठेवली आहेत. मात्र मुंबईसारख्या शहरात लाकडे मिळवणेही कठीण असल्याचे ते म्हणाले. लाकडे सहज मिळत नाहीत. त्यामुळे सगळीकडे शोधून ती जमा केली आहेत. पण किती दिवस असे करावे लागणार, हा प्रश्न पडला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या खानावळीत महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरी करणारे युवक तसेच हॉस्टेलमध्ये राहणारे तरुण नियमित जेवायला येतात. या मुलांचे येथे कोणी नसल्यामुळे ते आमच्यावरच अवलंबून आहेत. त्यांना उपाशी ठेवू शकत नाही. त्यामुळे चुली मांडून तरी त्यांच्यासाठी जेवण तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे पाटील म्हणाले. सध्या सुमारे २५ ते ३० जणांच्या जेवणाची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र गॅस तुटवडा कायम राहिला तर अनेक लहान हॉटेल्स आणि खानावळी बंद पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

“कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळातही एवढ्या अडचणी जाणवल्या नव्हत्या. सरकारने लवकरात लवकर गॅस पुरवठ्याबाबत उपाययोजना कराव्यात, अन्यथा अनेकांना उपाशी राहण्याची वेळ येईल,” अशी मागणीही त्यांनी केली.