प्रभाग क्रमांक आठमधून गीता जैन आणि कॅटलीन परेरा यांच्यात लढत होण्याची शक्यता

मीरा-भाईंदरच्या विद्यमान महापौर भाजपच्या गीता जैन यांनी आपल्या प्रभाग क्रमांक सहा या भाईंदर पश्चिम येथील परंपरागत मतदार संघातून उमेदवारी दाखल केली असली तरी  पक्षादेशानुसार त्यांनी आता प्रभाग आठमधूनही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच प्रभागातून माजी महापौर कॅटलीन परेरा या शिवसेनेकडून निवडणूक लढवणार आहेत, परंतु परेरा या प्रभागातील वेगळ्या जागेवर लढत असल्याने आजी आणि माजी महापौरंची थेट लढत टळली असली तरी दोन्ही मातब्बर पॅनल एकमेकांसमोर येणार असल्याने ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

गीता जैन या बावन जिनालय परिसर या सध्याच्या प्रभाग ६ या त्यांच्या नेहमीच्या प्रभागात निवडणूक लढवत असतात. या प्रभागातून त्या २००२ आणि २०१२ मध्ये निवडून आल्या. २००७ मध्ये त्यांच्या प्रभागात आरक्षण आल्याने त्या दुसऱ्या प्रभागात स्थलांतर व्हावे लागले होते. यावेळी चार सदस्यांचा प्रभाग असल्याने त्यांचा प्रभाग मोठा झाला आहे. या प्रभागात जैन, गुजराती आणि मारवाडी बहुसंख्येने असल्याने प्रभाग ६ सध्यातरी भाजपला अनुकूल असल्याचे मानले जात आहे. गीता जैन यांना थेट मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाला असल्याने त्यांनी पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची यादी घोषित झालेली नसतानाही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशीच आपली उमेदवारी प्रभाग ६ मधून दाखल केली, शिवाय याच प्रभागातून निवडणूक लढवण्याचे निश्चित झाले असल्याने त्यांनी आपल्या प्रचाराची एक फेरीदेखील पूर्ण केली आहे.

जैन यांना प्रभाग ८ मधूनही उमेदवारी दाखल करण्याचे आदेश पक्षाने दिले. त्यामुळे त्यांनी आठ (ब ) मधूनही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच प्रभागातून शिवसेनेतर्फे माजी महापौर माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सा यांच्या कन्या कॅटलीन परेरा यांनी ८ (अ) मधून उमेदवारी दाखल केली आहे. परेरा या ठिकाणाहून २०१२ मध्ये निवडून गेल्या आहेत. त्यांनीही या प्रभागात प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. जैन, गुजराती आणि मारवाडी समाजाचे प्राबल्य या प्रभागात असले तरी मराठी भाषिकांची संख्यादेखील या ठिकाणी लक्षणीय आहे. त्यामुळेच दोन्ही पक्षांना या प्रभागात विजयाची खात्री आहे. गीता जैन यांना या ठिकाणी नव्याने सुरुवात करावी लागणार असल्याने त्या आपला परंपरागत मतदारसंघ सोडून या प्रभागात निवडणूक लढवण्यास फारशा उत्सुक नाहीत, परंतु भाजपला माजी महापौर कॅटलीन परेरा यांच्या पॅनलविरोधात सक्षम उमेदवार मिळत नसल्यानेच त्यांनी गीता जैन यांना रिंगणात उतरवण्याचे डावपेच आखले आहेत. दुसरीकडे मेन्डोन्सा यांनीदेखील हा प्रभाग प्रतिष्ठेचा केला आहे. तुल्यबळांच्या उमेदवारीने ही लढत सर्वाच्या चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

[jwplayer o95KfegN]

जैन उमेदवारी स्वीकारणार?

गीता जैन या प्रभाग ८ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याने त्या याठिकाणी पक्षाने दिलेली उमेदवारी स्वीकारणार का असा प्रश्न निर्माण होत आहे. याठिकाणी भाजपला सक्षम महिला उमेदवार असल्याने जैन यांनी याठिकाणी अर्ज करण्यास सांगण्यात आले असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले असले तरी भाजपमधील अंतर्गत वादामधूनही गीता जैन यांनी प्रभाग आठमधून निवडणूक लढवण्यास सांगितले गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जैन यांनी कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवायची यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

भाजपने प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अंतिम निर्णय पक्षाच्या हाती असून पक्ष जो निर्णय होईल तो आपल्याला मान्य आहे.     – गीता जैन, महापौर