डोंबिवली – डोंबिवलीतील ज्येष्ठ गायक आणि गीतरामायणाचे सादरकर्ते धनंजय भोसेकर आणि परिवाराकडून डोंबिवलीत तीन दिवसांचा गीतरामायण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार (ता.८) ते रविवार (११) सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात स्वर संस्कार निर्मित धनंजय भोसेकर परिवाराकडून आयोजित हा गीतरामायणाच्या सादरीकरणाचा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे.या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका डोंबिवली एमआयडीसीतील घरडा सर्कल येथील सावित्रीबाई फुले रंगमंदिर येथे गीतरामायण कार्यक्रमाच्या एक तास अगोदर उपलब्ध होणार आहेत. मागील अनेक वर्षापासून गीतरामायणाचे सादरकर्ते आणि ज्येष्ठ गायक धनंजय भोसेकर स्वरतीर्थ सुधीर फडके तथा बाबूजींच्या गीतरामायणाची आठवण करून देण्यासाठी तीन दिवसात गीतरामायणातील ५६ गाण्यांचे सादरीकरण करतात. या कार्यक्रमाला ठाणे, डोंंबिवली, कल्याण परिसरातील नागरिकांचा दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद असतो.
अयोध्येत राममंंदिराची उभारणी झाल्यानंतर भोसेकर परिवाराकडून हा कार्यक्रम आमदार रवींंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने मागील वर्षी डोंबिवली जीमखाना मैदानावर आयोजित करण्यात आला होता. शुक्रवार, शनिवार रात्री साडे आठ वाजता आणि रविवारी दुपारी साडे तीन वाजता कार्यक्रमाची वेळ आहे. या कार्यक्रमात गायक धनंजय भोसेकर आपल्या ताकदीने बाबूजींच्या स्वरातील गीतरामायणाची गाणी सादर करतात. देवयानी धनंजय भोसेकर या गीतरामायणातील प्रसंग आपल्या निवेदनातून मांडून कार्यक्रमाला एका उंचीवर नेतात.
मागील २९ वर्ष भोसेकर परिवाराकडून गीतरामायणाचा हा कार्यक्रम सादर केला जातो. या कार्यक्रमात भोसेकर यांना पेटीवर साथ नीला सोहनी, तबला प्रमोद सोहनी आणि ताल वाद्याला व्यंकटेश कुलकर्णी यांची साथ असते. धनंजय भोसेकर यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या एका गुणवंत व्यक्तिचा सदगुरू चंंद्रकांत अनंत भोसेकर सेवाव्रती पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यावर्षीचा हा पुस्कार वाचन संस्कृतीच्या प्रचार आणि प्रसाराचा ध्यास घेतलेले चळवळीचे कार्यकर्ते पै फ्रेन्डस लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांना देण्यात येणार आहे. या तीन दिवसांच्या कार्यक्रमाला प्रा. डाॅ. शुभदा जोशी, अजित करकरे, प्रा. डाॅ. विनय भोळे, माधव जोशी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.