शासकीय स्तरावर हालचालींना जोर; महापालिकेपुढे आर्थिक पेच

ठाणे : वाहतूक कोंडीचा विळखा बसलेल्या घोडबंदर रस्त्याला पर्याय म्हणून आखण्यात आलेल्या खारेगाव ते गायमुख चौपाटी या खाडी किनारी मार्गाच्या भूसंपादनासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रकल्पासाठी शासकीय मालकीच्या जमिनी ताब्यात घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असली तरी, खासगी जमिनींच्या संपादनाचा तिढा कायम आहे.

घोडबंदर रस्त्याला पर्याय म्हणून खारेगाव ते गायमुख चौपाटी असा खाडीकिनारा मार्ग उभारण्यात येत आहे. १३ किलोमीटरच्या मार्गासाठी ६ लाख १० हजार ६८९ चौरस मीटर जागा लागणार आहे. त्यापैकी २.७२ किलोमीटरच्या मार्गासाठी लागणारी १ लाख २३ हजार ५८७ चौरस मीटर जागा पालिकेच्या ताब्यात आहे. उर्वरित १०.७१ किलोमीटरच्या मार्गासाठी ४ लाख ८७ हजार ४०२ चौरस मीटर जागेचे पालिकेला भूसंपादन करावे लागणार आहे. त्यामध्ये ३ लाख ८२ हजार ०८४ २.७२ चौरस मीटर जागा शासकीय, ९५ हजार ५१८ चौरस मीटर जागा खासगी आणि ८६ हजार २६३ चौरस मीटर जागा वन विभागाची आहे. त्यापैकी शासकीय जागा ताब्यात घेण्यासंदर्भात ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची बुधवारी पालिका मुख्यालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रकल्पासाठी शासकीय जमीन देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. परंतु खासगी जमीन संपादनाचे मोठे आव्हान पालिकेपुढे आहे. या संपूर्ण जमिनीच्या अधिग्रहणाची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. तिजोरीत आधीच खडखडाट असलेल्या महापालिकेला जमिनीच्या अधिग्रहणासाठी किती पैसे मोजावे लागतील याचा अभ्यासही सुरू असून यासाठी शासकीय मदत मागावी लागेल, असा सूर आहे.

एमएमआरडीएच्या मंजुरीचीही प्रतीक्षा

घोडबंदर रस्त्याला पर्याय म्हणून खारेगाव ते गायमुख चौपाटी असा खाडीकिनारा मार्ग तयार करण्याची घोषणा पालिकेने काही वर्षांपूर्वी केली होती. मात्र, डॉ. विपीन शर्मा यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याच्या कामाने वेग घेतला. नगरविकास  खात्याचे मंत्रिपद असलेले ठाणे जिल्’ााचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासाठी प्रयत्न सुरू केले. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकल्पाचा आराखडा तयार करून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठविला. या आराखड्यास अजूनही महानगर विकास प्राधिकरणाची अंतिम मंजुरी मिळालेली नाही.

खारेगाव ते गायमुख चौपाटीपर्यंतचा मार्ग लांबी एकूण १३ किलोमीटर

४० ते ४५ मीटर रुंदीचा आठ पदरी रस्ता

१.१३ किमी उन्नत मार्ग, ५०० मीटरचा भुयारी मार्ग, वाघबीळ भागात जाण्यासाठी मार्गिका.

७.२९ किमीचा रस्ता ‘सीआरझेड’मधून जाणार

अंदाजे खर्च १,२५१ कोटी रुपये.

कोस्टल मार्गाकरिता शासकीय

जमिनींचा ताबा देण्यासंदर्भात आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यामध्ये जमिनीचा ताबा देण्यासंदर्भात असलेल्या काही त्रुटी दूर करण्याबाबत चर्चा झाली असून दोन्ही बाजूने सकारात्मक चर्चा झाली आहे. – राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हाधिकारी