डोंबिवली – शिवजयंतीनिमित्त डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसीतील घारडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम सोमवारी संध्याकाळी चार ते रात्री ११ या कालावधीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमाची पूर्व तयारी आणि लोकार्पण सोहळ्यानिमित्त घारडा सर्कल चौकाकडे येणारे सर्व रस्ते रविवारी रात्री १० ते सोमवारी रात्री ११ या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय कोळसेवाडी वाहतूक विभागाने घेतला आहे.

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशावरून कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी घारडा सर्कल रस्ता बंद बाबतची माहिती सूचना प्रसारित केली आहे. डोंबिवली शहराचे प्रवेशव्दार म्हणून घारडा सर्कल चौक ओळखला जातो. सर्वाधिक वाहन, पादचारी वर्दळीचा हा भाग आहे. अश्वारूढ पुतळा लोकार्पण कार्यक्रमाच्या दिवशी या भागात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने या भागात विशेष काळजी घेतली आहे. घारडा सर्कल रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार असला तरी या भागातील पर्यायी रस्ते मार्ग वाहतुकीसाठी खुले असणार आहेत. वाहतूक सुस्थितीत ठेवण्यासाठी या भागात पुरेसे मनुष्यबळ तैनात असणार आहे, असे कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी सांगितले.

रस्ते बंंद व पर्यायी रस्ते

डोंबिवली शहरातून घारडा सर्कलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शिवम रुग्णालय येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने डोंबिवली जीमखाना रस्ता, सागर्लीमार्गे इच्छित स्थळी जातील. शिळफाटा रस्त्याने सुयोग हाॅटेल, रिजन्सी अनंतम समोरून डोंबिवली शहरात पेंढरकर महाविद्यालयमार्गे घारडा सर्कलकडे येणाऱ्या वाहनांना आर. आर. रुग्णालय येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने एमआयडीसीतील कावेरी चौक, मिलापनगरमार्गे इच्छित स्थळी जातील.

कल्याणकडून खंबाळापाडा, ९० फुटी रस्ता, ठाकुर्ली चोळे भागातून घारडा सर्कलकडे येणाऱ्या सर्व वाहनांना बंदिश पॅलेश हाॅटेल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने सावित्रीबाई फुले नाट्यगृह रस्तामार्गे इच्छित स्थळी जातील. आजदे गाव, आजदे पाडा येथून घारडा सर्कलकडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्याने इच्छित स्थळी जातील.

घारडा सर्कल येथे शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण सोमवारी होत आहे. या कार्यक्रमाची पूर्वतयारी आणि लोकपर्णाच्या दिवशी घारडा सर्कल भागात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हा चौक रविवारी रात्री १० ते सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहन चालक, प्रवाशांनी पर्यायी रस्ते मार्गाचा अवलंब करून वाहतूक विभागाला सहकार्य करावे.-सचिन सांडभोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी वाहतूक विभाग.