scorecardresearch

घोडबंदरचे सेवा रस्ते उखडलेलेच; दुरुस्ती केलेल्या रस्त्यांची दुरवस्था, नागरिकांची दुहेरी कोंडी

मेट्रोच्या कामामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी यासाठी घोडबंदर मार्गावरील सेवा रस्त्यांची दुरुस्ती करून प्रवाशांना दिलासा देण्याच्या मोठय़ा गप्पा ठाण्यातील राजकीय नेते तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मारल्या जात आहेत.

नीलेश पानमंद
ठाणे : मेट्रोच्या कामामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी यासाठी घोडबंदर मार्गावरील सेवा रस्त्यांची दुरुस्ती करून प्रवाशांना दिलासा देण्याच्या मोठय़ा गप्पा ठाण्यातील राजकीय नेते तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मारल्या जात आहेत. मात्र, निकृष्ट दर्जाची दुरुस्तीची कामे आणि नियोजनाअभावी अध्र्याहून अधिक भागाकडे केले जाणारे दुर्लक्ष यामुळे या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्यांचे हाल दिवसागणिक वाढू लागल्याचे चित्र आहे.
गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिकेकडून सेवा रस्त्यांची सातत्याने दुरुस्ती केली जात आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. गेल्यावर्षी खड्डे भरणीची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याने या प्रकरणी महापालिका प्रशासनाने चार अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. महापालिकेतील काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने निलंबनाची ही कारवाई देखाव्यापुरती ठरती. निलंबन नाटय़ानंतरही सेवा रस्त्यांची दुरवस्था आजतागयत कायम आहे.
गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांसमवेत या रस्त्यांचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी रस्त्यावरील खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून पालिका अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती. पावसाळय़ाआधी रस्त्यांची डागडुजी करूनही पावसाळय़ात रस्त्यांवर खड्डे पडतात, याचा अर्थ कामाची गुणवत्ता तपासली जात नाही. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील हे रस्ते असतील, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करा, संबंधित ठेकेदारावर कारवाई करा, गरज पडल्यास काळय़ा यादीत टाका तसेच याबाबत संपूर्ण चौकशी करून कठोर कारवाई करा, असे निर्देश शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने चार अभियंत्यांना निलंबित केले होते. काही महिन्यानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते.
पालकमंत्र्यांच्या दट्टय़ानंतरही परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. घोडबंदर रस्त्यावरील आनंदनगर तसेच गायमुख येथे काही भागात रस्ते खोदून ठेवले आहेत. तर काही ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. काही भागात रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले असून त्याठिकाणी मलवाहिन्यांच्या चेंबर्सपेक्षा रस्ता उंच झाला आहे. यामुळे चेंबर्सच्या भागात मोठे खड्डा दिसून येतो. पातलीपाडा ते गायमुखपर्यंतच्या सेवा रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पालिकेने हाती घेतले असून त्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे.
खोदकामामुळे परिणाम
ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरात रस्ते रुंदीकरण मोहीम काही वर्षांपूर्वी राबविली. त्यावेळेस त्यांनी कापूरबावडी ते गायमुखपर्यंतच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांचे नूतनीकरण केले होते. त्यानंतर काही वर्षांतच वाहिन्यांच्या खोदकामामुळे हा रस्ता पुन्हा उखडला. त्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात येते. या संदर्भात महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्याशी संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
खराब रस्त्यांची ठिकाणे
• कापूरबावडी येथून गायमुखच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्तावरील मानपाडा, पातलीपाडा भागात रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
• काही भागात रस्ते खोदून ठेवले आहेत. या भागात काही ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, रस्त्याची उंची वाढल्याने मलवाहिन्यांचे चेबर्स खाली गेले असून यामुळे याठिकाणी मोठे खड्डे दिसून येतात.
• वाघबीळ ते कावेसपर्यंत रस्ता सुस्थितीत आहे. त्यापुढे रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यांचा वापर बंद असल्याने ते ओस पडले आहेत.
• भाईंदरपाडा भागात रस्ते दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे दिसून येते. तर, घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या सेवा रस्त्यावरील गायमुख, भाईंदरपाडा, ओवळा, पातलीपाडा, माजिवाडा या भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
• मानपाडा भागात वाहिन्या टाकण्याच्या कामासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. रस्त्यांच्याकडेला बेकायदा वाहने उभी केली जात असल्यामुळे कोंडी होत आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ghodbandar service roads uprooted poor condition repaired roads double dilemma citizen s amy

ताज्या बातम्या