ठाणे : घोडबंदर येथील गायमुख घाटाजवळ अवजड वाहन उलटल्याने तसेच, मिरा भाईंदर जवळील काशीगाव येथे अवजड वाहन बंद पडल्याने रविवारी सकाळी घोडबंदर घाटात गायमुख ते फाऊंटन पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे मिरा भाईंदर, वसई, विरार, पालघर, बोरीवली भागातून ठाणे शहराच्या दिशेने वाहतूक करणाऱया चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. सकाळी 9.30 नंतरही वाहतूक कोंडी कायम होती.

घोडबंदर घाटात मागील काही दिवसांपासून खड्डे, वाहने बंद पडणे अशा विविध कारणांमुळे वाहतूक कोंडी होत असते. रविवारी सकाळी मिरा भाईंदर जवळील काशीगाव भागात एक अवजड वाहन अचानक बंद पडले. तसेच, गायमुख घाटाजवळ मिरा भाईंदर भागातून ठाण्याच्या दिशेने प्रवास करणारा कंटेनर उलटला. रविवारी सकाळी या मार्गावर वाहनांचा भार अधिक होता. त्यातच, या दोन्ही घटनांमुळे मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गायमुख घाट ते फाऊंटन पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

या वाहतूक कोंडीमुळे मिरा भाईंदर, वसई, विरार, पालघर, बोरीवली भागातून अनेकजण कामानिमित्ताने वाहतूक करत असतात. तसेच गुजरात येथील जड वाहनांचा भार देखील मार्गावर असतो. या वाहतूक कोंडीमुळे अनेक बसगाड्या, हलकी वाहने, ट्रक, टेम्पो वाहतूक कोंडीत अडकून होते. प्रवाशांचे वाहतूक कोंडीमुळे प्रचंड हाल झाले. वाहन चालकांना अवघ्या 10 मिनीटांच्या अंतरासाठी किमान अर्धा ते पाऊण तास लागत होता. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान, सकाळी 9.30 नंतरही वाहतूक कोंडी सुटली नव्हती. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.