ठाणे : घोडबंदर मार्गावरील घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी संपणार होते. परंतु रस्त्याचे डांबरीकरण अद्यापही शिल्लक असल्याने हे काम आज, शुक्रवारी सायंकाळी पूर्ण होणार आहे. त्यानंतर येथील वाहतूक पूर्ववत केली जाईल अशी माहिती ठाणे वाहतुक शाखा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. मागील दोन आठवड्यांपासून घाट रस्त्याच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. या कामांमुळे घोडबंदर आणि मुंबई अहमदाबाद मार्गावर कोंडीचा सामना वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे मार्गिका खुल्या झाल्यास वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई, गुजरात, भिवंडी आणि उरण येथील जेएनपीटी बंदरातून दररोज हजारो अवजड वाहनांची वाहतूक घोडबंदर मार्गे होते. या मार्गावरून मुंबई, वसई, विरार, भाईंदर भागातून वाहतुक करणाऱ्या हलक्या वाहनांचे प्रमाणही अधिक आहे. राज्य परिवहन सेवा (एसटी) तसेच महापालिकांच्या परिवहन विभागाच्या बसगाड्या देखील येथून वाहतूक करतात. घोडबंदर घाट मार्गावर पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात खड्डे पडत असतात. त्यामुळे कोंडी होऊन त्याचा फटका वाहन चालकांना बसत असतो.

हेही वाचा…महामार्गावर पाच वाहनांची एकमेकांना धडक; दोनजण जखमी

पावसाळ्यात पुन्हा एकदा कोंडीचा फटका वाहन चालकांना बसून कोंडी होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. २४ मे पासून टप्प्यांमध्ये हे काम केले जात असल्याने घोडबंदर मार्गावर मोठ्या वाहतुक कोंडीला ठाणेकरांना सामोरे जावे लागत आहे. या कामाची मुदत गुरुवारी संपणार होती. परंतु हे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. येथील डांबरीकरणाला सुरूवात झाली असून हे काम शुक्रवारी सायंकाळी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर येथून वाहतूक सुरू होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा…रुंंदीकरण केलेल्या ठाण्यातील रेल्वे फलाटावर पावसाच्या पाण्याचे तळे, लोकलमध्ये चढताना प्रवाशांची कसरत

अवजड वाहनांमुळे कोंडी कायम

घोडबंदर मार्गाच्या दुरुस्ती कामांसाठी अवजड वाहनांना या मार्गावर बंदी लागू केली आहे. असे असले तरी पर्यायी मार्ग कोंडत असल्याने अवजड वाहनांची घोडबंदर मार्गावरून वाहतुक सुरूच आहे. बुधवारी रात्री अवजड वाहनांचा भार घोडबंदर मार्गावर वाढला. त्यामुळे गुरुवारी या मार्गावर गायमुख, कासारवडवली ते वागबीळ भागात मोठी वाहतुक कोंडी झाली होती. वाहतुक कोंडीमुळे वाहन चालकांना मन:स्ताप सहन करावा लागला.