ठाणे : घोडबंदर येथील घाट मार्गात शुक्रवारी सकाळपासूनच खड्डे, पाऊस आणि वाहनांचा भार वाढल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे घाट मार्गावर चेनापूल ते ओवळा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले आहेत. अवघ्या १० मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना अर्धा तास लागत आहे.

घोडबंदर मार्गावरून सकाळी हजारो वाहने वाहतूक करत असतात. येथील घाट मार्ग अरुंद असून वाहनांचा भार वाढल्यास नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागतो. मंगळवारी सकाळपासूनच येथील चेना पूल ते ओवळापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यातच येथील करपे कंपाऊंड परिसरात मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच पाऊस आणि वाहनांचा भार यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. मिरारोड, भाईंदर, वसई-विरार भागातून हजारो नोकरदार सकाळी कामानिमित्ताने घोडबंदर मार्गे ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करत असतात.

तसेच ठाणे येथून देखील अनेकजण बोरीवली, दहिसर, वसई, विरार आणि पालघरच्या दिशेने कामानिमित्ताने वाहतूक करतात. परंतु वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. अवघ्या १० मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना अर्धा तास लागत होता. त्यामुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. परिवहन सेवेच्या बसगाड्या वाहतूक कोंडीत अडकून होत्या. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता. घोडबंदरच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवास करण्यासाठी अक्षरश: वीट आल्याचे प्रवाशांचे म्हणणे होते. दरम्यान, सकाळी ८.३० नंतरही वाहतूक कोंडी सुटली नव्हती.