ठाणे – घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी, तसेच सेवा रस्त्यावरील बेकायदा पार्किंग बंद व्हावी, यासाठी मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम पुर्ण झालेल्या काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध राहिलेल्या विद्युत खांब तसेच पेट्यांच्या आडोशाने आणि पदपथांवर पुन्हा पार्किंग सुरू झाल्याने प्रकल्पाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.मुंबई महानगरातील वाहतूकीसाठी घोडबंदर रस्ता महत्वाचा मानला जातो.

या मार्गावरून अवजड तसेच स्थानिक नागरिकांच्या वाहनांची सतत वर्दळ असते. या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने निर्माण होत होती. तसेच सेवा रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी होणारे बेकायदा पार्किंग, रस्त्यालगत उभी राहणारी वाहने आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी हा या भागातील प्रमुख प्रश्न बनला होता. त्यावर उपाय म्हणून घोडबंदर मुख्य रस्ता आणि सेवा रस्ते थेट जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पाअंतर्गत काही ठिकाणी जोडणीचे काम पूर्ण झाले असून काही भागांत अद्याप काम सुरू आहे.

मात्र ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले, त्या भागांत नव्यानेच अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पदपथांवर तसेच रस्त्यालगत वाहने उभी केली जात आहेत. विशेष म्हणजे, जोडणी कामादरम्यान स्थलांतरित होणे अपेक्षित असलेल्या उच्च दाबाचे विद्युत खांब तसेच विद्युत पेट्या हलविण्यात आलेले नाहीत. परिणामी, जोडणी रस्ता तयार झाल्यानंतर या विद्युत पेट्या अक्षरशः रस्त्याच्या मधोमध उभ्या राहिल्या आहेत. या पेट्यांच्या आडोशाने वाहनचालक वाहने उभी करत आहेत.

रस्त्याच्या मधोमध, पदपथालगत आणि पदपथावर अशा तिन्ही ठिकाणी वाहने उभी केली जात आहेत. मानपाड्यापासून ते कासारवडवलीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला हेच चित्र दिसून येत आहे.चौकटवाहतूक कोंडीची समस्या सुटावी, तसेच सेवा रस्त्यावरील बेकायदा पार्किंग बंद व्हावी आणि या संपुर्ण रस्त्याचा वापर वाहतूकीसाठी व्हावा या उद्देशातून मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी प्रकल्प राबविण्यात आला. मात्र पदपथ, त्यालगतचा रस्ता तसेच मुख्य आणि सेवा रस्त्याच्या मधोमध असलेले उच्च दाबाचे विद्युत खांबाच्या आडोश्याला वाहने उभी केली जात असून यामुळे या प्रकल्पाच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रकल्प कायघोडबंदर मुख्य व सेवा रस्ता जोडणी प्रकल्प हा वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत मुख्य रस्त्याला लागून असलेल्या सेवा रस्ते जोडण्यात येत आहेत. यात कापुरबावडी ते गायमुख पर्यंत १०. ५० किमी अंतरापर्यंतचा मुख्य आणि सेवा रस्ता एकमेकांना जोडला जाणार आहे. या कामासाठी ५६० कोटींचा खर्च करण्यात येत आहे. या कामामध्ये तब्बल २ हजार १९६ वृक्ष बाधित झाले आहेत. शिवाय याठिकाणी महावितरणचे पेट्या, विद्युत खांब आणि उच्च दाबाची वाहीनी स्थलांतरीत करण्यासाठी ६९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.