Ghodbunder Road Flyover Condition: घोडबंदर मार्गावरील प्रवास खड्डेमुक्त व्हावा यासाठी संपुर्ण रस्ता काँक्रिटचा करण्याची कामे वेगाने सुरू असली तरी, याच मार्गावरील उड्डाण पुलांच्या दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. मास्टिक पद्धतीने तयार करण्यात आलेला रस्ता उंच-सखल झाल्याने अवजड वाहने हेकलावे घेऊन वाहतूक करीत आहेत तर, काही ठिकाणी मास्टिकचे फुगवटे काढण्यासाठी खरडविण्यात आलेल्या रस्त्यावरून दुचाकींचे तोल जात असल्याने अपघातांची भिती वाढली आहे. यामुळे घोडबंदरच्या उड्डाण पुलांवरील प्रवास दुचाकीस्वारांसाठी धोक्याचा ठरू लागला आहे.
घोडबंदर मार्गावरून उरणच्या जेएनपीटी बंदर ते गुजरात अशी अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. दुपार आणि रात्रीच्या वेळेत ही वाहतूक सुरू असते. याशिवाय, स्थानिक नागरिकांची वाहनेही याच मार्गावरून वाहतूक करतात. ही वाहतूक सकाळ आणि सायंकाळी सुरू असते. यामुळे घोडबंदर मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. या मार्गावर मेट्रो, मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी अशी कामे सुरू आहेत. दरवर्षी या मार्गावर पावसाळ्यात खड्डे पडतात आणि यामुळे वाहतूकीचा वेग मंदावून कोंडीची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडविण्यासाठी मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी प्रकल्प राबवून रस्ता रुंद करण्यात येत आहे. या रुंदीकरण कामादरम्यान, रस्ते काँक्रीटचे करण्यात येत आहेत. नागरिकांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा या उद्देशातून रस्ते काँक्रीटचे करण्यात येत आहे. असे असले तरी, याच मार्गावरील उड्डाण पुलावरील डांबरी रस्त्यांची मात्र दुरावस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
घोडबंदर मार्गावरील माजिवाडा, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ, कासारवडवली असे उड्डाणपुल आहेत. यातील कासारवडवली उड्डाण पुल काही महिन्यांपुर्वीच वाहतूकीसाठी खुला करण्यात आला असून हा पुल वगळता इतर माजिवाडा, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ पुलांवरील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मास्टीक पद्धतीने हे रस्ते तयार करण्यात आले होते. मात्र, अनेक ठिकाणी रस्ते उंच सखल झाले आहे. काही ठिकाणी खड्डेही पडले आहेत. तसेच या मार्गावर मास्टिकचे मोठे फुगवटे तयार झाले होते.
काही ठिकाणचे फुगवटे काढण्यासाठी तेथील डांबर यंत्राने खरडवून काढण्यात आले आहे. खरडवून काढण्यात आलेल्या भागातून दुचाकीस्वारांचा तोल जात आहे. रस्त्याची परिस्थिती पाहता येथे दुचाकींचा अपघात होण्याची शक्यता आहे. मास्टिक पद्धतीने तयार करण्यात आलेला रस्ता उंच-सखल झाल्याने अवजड वाहने हेकलावे घेऊन वाहतूक करीत आहेत. ही वाहने उलटून अपघातांची भिती व्यक्त होत आहे.
खड्डे भरण्याच्या सूचना कागदावरच; घोडबंदर मार्गावरील कामांना विलंब दरवर्षी पावसाळा सुरु झाल्यावर यंत्रणांकडून खड्डे भरणीची कामे सुरू केली जातात आणि पावसाळ्यात पुन्हा भरलेले खड्डे उखडतात, हे चित्र दरवर्षी दिसून येते. हीच बाब लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वीस दिवसांपुर्वी झालेल्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महत्वाचे आदेश दिले. पावसाळ्यापुर्वी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून रस्ते दुरुस्ती, खड्डे भरणे, डांबरी पॅचवर्क मे अखेरपर्यंत पूर्ण करावे आणि नागरिकांना गैरसोय होऊ नये, अपघात टळावेत यासाठी खबरदारी घ्यावी असे आदेश दिले. यानंतरही संबंधित यंत्रणेकडून घोडबंदर मार्गावरील उड्डाण पुलांच्या दुरुस्तीसाठी हालचाली होत नसल्याचे चित्र आहे.
