ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा भागात मेट्रो प्रकल्पासाठी खोदण्यात आलेल्या सुमारे १० फूट खोल खड्ड्यात २५ टन वजनाचा मालवाहू कंटेनर उलटला. या अपघातात कंटेनर चालक वाहनामध्ये अडकला होता. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला कंटेनरमधून बाहेर काढले. कंटेनर चालक अमित यादव (३०) याला दुखापत झाली असून कंटेनर खड्ड्यातून बाहेर काढण्याचे काम सुरु होते.

घोडबंदर मार्गावरून हजारो अवजड वाहने जेएनपीए बंदरातून गुजरातच्या दिशेने वाहतूक करतात. हा मार्ग वाहतुकासाठी अत्यंत महत्त्वाचा असून यात मार्गालगत लोकवस्ती देखील वाढली आहे. मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी येथे मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु आहे. या प्रकल्पांतर्गत मानपाडा येथे पाण्याच्या टाकीसाठी सुमारे १० फूट खोल खड्डा खणला होता.

रविवारी सकाळी जेएनपीए बंदरातून गुजरातच्या दिशेने कंटेनर वाहतूक करत होता. हा कंटेनर सकाळी ६ वाजताच्या सुमारास मानपाडा भागात आला असता, चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर खोल खड्ड्यात कोसळला. या कंटेनरमध्ये २५ टन वजनाचे भंगारातील वाहनाची चाके होती.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णवाहिकेतील डाॅक्टर, चितळसर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे कंटेनर चालक अमित यादव हा कंटेनरमध्ये अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला कंटेनरमधून बाहेर काढले. रुग्णवाहिकेतील डाॅक्टरांनी त्याला प्राथमिक उपचार करुन चितळसर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला किरकोळ दुखापत झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव खड्ड्याभोवती अडथळे उभारण्यात आले आहेत. तर कंटेनरला बाहेर काढण्याचे कार्य पथकांकडून सुरु होते.