ठाणे : घोडबंदरवासियांचा कोंडीमुक्त प्रवास व्हावा यासाठी मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी प्रकल्पात रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामेही पुर्ण झाली असून या नव्या -कोऱ्या रस्त्यावर ब्रेक लावून खोदाई करण्याची कामे काही ठिकाणी सुरू असल्याचे चित्र आहे. रस्ते कामात गाडलेल्या विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्ती कामामुळे ही खोदाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यानिमित्ताने रस्ते कामातील नियोजन गोंधळाचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.

मुंबई महानगरातील वाहतूकीसाठी घोडबंदर रस्ता महत्वाचा मानला जातो. या रस्त्यावरून अवजड तसेच स्थानिक नागरिकांच्या वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून या कामामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होत होती. तसेच अनेक ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. सेवा रस्त्यांवरही बेकायदा पार्किंग वाढली होती. नेमकी हि बाब लक्षात घोडबंदरचा मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले असून एमएमआरडीएमार्फत या रस्त्यांचे कँक्रीटीकरण करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून ही कामे सुरू आहेत. घोडबंदरवासियांचा कोंडीमुक्त प्रवास व्हावा यासाठी मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी प्रकल्पात रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे. परंतु या नव्या कोऱ्या रस्त्यावर खोदाई करण्यात येत असल्याचे चित्र आहे. घोडबंदरहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर आनंदनगर, मानपाडा या भागात रस्त्यावर नवा कोरा रस्त्याचा चौकणी आकारात भाग ब्रेकरने खोदण्यात आला असून काही ठिकाणी खोदाईनंतर पुन्हा दुरुस्ती करण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी व्यवस्थित दुरुस्ती केलेली नाही.

नियोजन अभाव

घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ते कामादरम्यान रस्त्याकडेला पदपथ आणि विविध वाहिन्यांसाठी टाकाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु विविध वाहिन्या टाकण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. परंतु जुन्या वाहिन्या काँक्रीट कामामुळे रस्त्याखाली गाडल्या गेल्या असून या वाहिन्या कामादरम्यान ना दुरुस्त झाल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी खोदाई करण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. यातूनच कामातील नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा दिसून येत आहे.

काय आहे प्रकल्प

घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी कामात कापुरबावडी ते गायमुख पर्यंत १०. ५० किमी अंतरापर्यंतचा मुख्य आणि सेवा रस्ता एकमेकांना जोडला जात आहे. या कामासाठी ५६० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या कामामध्ये तब्बल २ हजार १९६ वृक्ष बाधित झाले आहेत. शिवाय याठिकाणी महावितरणचे पेट्या, विद्युत खांब आणि उच्च दाबाची वाहीनी स्थलांतरीत करण्यासाठी ६९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.